जीर्णोद्धारीत पण कलात्मक आमलेश्वर मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 08:43 PM2018-02-28T20:43:22+5:302018-02-28T20:43:47+5:30

स्थापत्यशिल्पे : आधुनिक अंबाजोगाई शहराची वस्ती जरी आज सीमित जागेत असली, तरी अंबाजोगाईच्या धार्मिक भूगोलाने आजूबाजूचा मोठा परिसर व्यापला आहे. अंबाजोगाईसारख्या महत्त्वाच्या शहराच्या ऐतिहासिक आणि धार्मिक संचित समजून घेण्यासाठी काळाच्या विविध टप्प्यांवर कोणकोणती धार्मिक कलासाधनांची निर्मिती झाली आहे, हे बघणे जरुरीचे आहे. त्याचाच एक टप्पा आपल्याला अंबाजोगाई शहरापासून दोन किमी अंतरावर आमलेश्वर मंदिराच्या रूपाने दिसतो.

Renovated but Artistic Amleshwar Temple | जीर्णोद्धारीत पण कलात्मक आमलेश्वर मंदिर

जीर्णोद्धारीत पण कलात्मक आमलेश्वर मंदिर

googlenewsNext

- साईली कौ. पलांडे-दातार

अंबाजोगाईतील विविध मंदिरांमध्ये सकलेश्वर आणि आमलेश्वर मंदिरे ही तुलनेने आधीच्या काळातील म्हणजेच पूर्व यादव काळातली (१२ वे शतक) आहेत. आमलेश्वर मंदिर पूर्वाभिमुख असून एका प्राकारात बांधले आहे. तसेच, मंदिराच्या मागील बाजूस पावसाळी झरा असून त्याच्या बाजूच्या कातळातून दगड काढून मंदिराला वापरलेला असावा. काढलेल्या दगडातून एक बारव तयार केली गेली व शाश्वत पाण्याचा साठा निर्माण झाला. सभामंडप, अंतराल आणि गर्भगृह आणि निरंधार प्रदक्षिणा पथ आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूच्या अंतराळ व गर्भगृहाच्या मूळ शुष्कसांधी भिंती शाबूत आहेत, सभामंडपाच्या नवीन बांधल्या आहेत. आज सभामंडपाची मोठ्या प्रमाणात पुनर्बांधणी झालेली आहे. मंदिराच्या सभामंडपात तीन प्रवेश आहेत जिथे मूळचे अर्धमंडप असावे. मूळ मंदिराचा पाषाण या जीर्णोद्धारीत मंदिरात बसवलेले आहेत, ज्यावरून अर्धमंडप आणि सभामंडप अर्धखुले असावेत, हे आपल्या ध्यानात येते. मंदिर पीठाचा मोठा भाग आज जमिनीखाली गेला आहे. गजथर, रत्नथरावर छोट्या वामनभिंतीत अर्धस्तंभ व सुरसुंदरी, वादक आणि सिद्ध साधक कोरलेले आहेत. इथल्या गजथरांमध्ये विविध मुद्रेतील हत्तींचे शिल्पांकन आहे, तसेच त्यांच्याबरोबर लढणार्‍या मनुष्याकृती, सिंह व घोड्यांचेही चित्रण आहे. व्याल व किर्तीमुख ही कोरलेली आहेत. या थरावर छोट्या शिखर पंजरांची नक्षी आहे. त्यावरील थरांवर रत्नांची, शंकरपाळ्याच्या आकाराची नक्षी आहे. या वरचा मंदिराचा मुख्य भाग, मंडोवरावर किर्तीमुख व वेलबुट्टी नक्षी असलेले अर्धस्तंभ आहेत. अंतराळ व गर्भगृहावरील प्रत्येक दोन अर्धस्तंभांमधील खोलगट जागेत देव-देवतांची आणि सुरसुंदरींची शिल्पे अंकित आहेत.

गर्भगृह हे पंचरथ असून उत्तर, दक्षिण आणि पश्चिम दिशांना ३ देवकोष्टे आहेत, जी आज रिकामी आहेत. आज मंदिराचे मूळ शिखर अस्तित्वात नसल्यामुळे ते कसे असावे, याची कल्पना करणे अवघड आहे. चार मध्यवर्ती अलंकृत स्तंभांनी सभामंडपाचे भाग पाडले आहे व छत हे समतल (वितान) आहे. यातील दोन स्तंभ अप्रतिम शिल्पांनी नटलेली असून, त्यातील स्तंभ मध्यात रामपंचायतन, शिव-पार्वती व दैत्य युद्ध प्रसंग, गणपती, गजांतकशिव व सरस्वती, सप्तमातृका आणि गणपती व हत्तीचे युद्ध असे विस्तृत प्रसंग कोरले आहेत.  नागबंधयुक्त स्तंभांवर रांगेत छोट्या देवता मूर्ती, अंतरालाच्या देवकोष्टात गणपती व उमा माहेश्वराची खंडित मूर्ती आहे. अंतराळाचे नक्षीदार छत समतल असून, नंतरच्या काळात दुरुस्त केले आहे. चार कोपर्‍यात किर्तीमुख असून मधले अष्टकोनी कमळ दगडात कोरले आहे. किन्नर व विद्याधारांबरोबर, नृत्यमग्न शिवाची शिल्पे अंकित आहेत.

सभामंडपातील पूर्वेकडील आणि उत्तरेकडील छतावरील शिल्पपट्टावर युद्ध प्रसंग कोरलेले आहेत. या प्रसंगांमध्ये कृष्णाने सारथ्य केलेल्या अजुर्नाच्या रथाचे चित्रण आहे. अनेक बाणांचा वर्षाव करणार्‍या वीरांचे अत्यंत प्रभावी शिल्पांकन केलेले दिसते. मुख्य गर्भगृहाची द्वारशाखा खूप साधी आहे, जी नंतरच्या काळात बसवलेली असावी. स्तंभयुक्त द्वारशाखेवरील ललाटबिंबावर कुठलीही प्रतिमा नाही व दोन्ही बाजूला शैव द्वारपाल आहेत. गाभार्‍यातील शिवलिंग मूळचे नसावे. मंदिराच्या बाह्यभागावर अष्टभुज नृत्यगणपतीचे खंडित पण लयबद्ध शिल्प आहे. इतरत्र न आढळणार्‍या आणि उग्र आवेशातील चतुर्भुज नारसिंहीचे वेगळे शिल्प इथे आढळते. मूर्ती खंडित असली तरीही पायाशी असलेले पिशाच्च व हातात खेटक आणि खड्ग स्पष्ट दिसून येते. मर्कट आणि स्त्री, कर्पूरमंजिरी, पुत्रवल्लभा, नूपुरपादिका, शुकसारिका अशा कलात्मक सुरसुंदरी बाह्य भागावर आढळतात.

मंदिराच्या प्राकार भिंतीत विष्णूच्या त्रिविक्रम अवताराचा वेगळा शिल्पपट्ट आहे. नेहेमीप्रमाणे छत्र घेतलेला वामन बटू न दाखवता छोट्या  विष्णूरूपातून मोठ्या आकाराच्या बळी राजाच्या मस्तकावर तिसरे पाऊल ठेवणार्‍या त्रिविक्रमाचे अंकन केले आहे. तसेच, बाजूला बळीराजाची बायको, शुक्राचार्य व प्रसंगाचे साक्षीदार, ब्रह्मदेवाचे चतुर्भुज शिल्प आहे. मूळ मंदिरावर ही मोठ्या आकाराचा बळीराजा छोट्या वामन बटूला दान देताना उदक सोडतो आहे, असे याच अवतार कथेसंबंधीचे शिल्प आहे.
( sailikdatar@gmail.com)

Web Title: Renovated but Artistic Amleshwar Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.