Ramzan : काय असते 'चांद रात' ?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2018 07:00 AM2018-06-15T07:00:00+5:302018-06-15T07:00:00+5:30

रोजाधारक ज्याची आतुरतेने वाट पाहत असतो, ती म्हणजे चांद रात. याचे कारण म्हणजे त्याला रोजे केव्हा संपतात असे वाटत नाही, तर त्याला वेगळे कारण आहे, ते कोणते याची चर्चा आज आपण करणार आहोत

Ramzan: What is Chand Raat? | Ramzan : काय असते 'चांद रात' ?

Ramzan : काय असते 'चांद रात' ?

नौशाद उस्मान

रमजानच्या शेवटच्या दिवशी म्हणजे एकोणतीस किंवा तिसाव्या दिवशी संध्याकाळी चंद्रकोर दिसली तर दुसऱ्या दिवशी ईद साजरी केली जाते. जेव्हा ही चंद्रकोर दिसते त्या रात्रीला 'चांद रात' म्हटले जाते. या रात्री पूर्ण रमजान महिन्याचे रोजे भक्ती भावाने, इमाने इतबारे ठेवणाऱ्या रोजाधारकांचे संपूर्ण पापक्षालन  केले जाते. याला अपवाद फक्त चार प्रकारचे लोकं असतात ते म्हणजे १) आई वडिलांचा अवज्ञाकारी २) दारुडा ३) माघारी चुगली चहाडी करणारा आणि ४) जीवा भावांची नाती तोडणारा (फूट पाडणारा). या चार प्रकारच्या लोकांव्यतिरिक्त सर्व रोजाधारकांचे पाप त्या रात्री माफ झाल्याची घोषणा अल्लाह करतो.
याविषयी प्रेषित मुहम्मद सल्लम यांचे वचन आहे -

''रमजानच्या अखेरच्या रात्री सर्व रोजाधारक इमानवंताचे पापक्षालन होते.'' यावर त्यांच्या सहकाऱ्यांनी विचारलं, ''हे प्रेषित सल्लम, ती रात्र म्हणजे शब ए कद्र (बडी रात) का?'' प्रेषितांनी उत्तर दिले, ''नाही, तर ज्या रात्री भक्त आपली कर्तव्यपूर्ती करतो.''
संदर्भ: हदिस - अहमद शरीफ

म्हणजे रमजानच्या पूर्ण रोजांची सांगता होते, ती रात्र म्हणजेच ईदची पूर्वसंध्या. याच संध्याकाळी रमजानच्या पुढचा अरबी महिना शव्वालच्या एक तारखेची पहिली चंद्रकोर दिसते.

यावेळी उपरोक्त अपवाद वगळता मागचे पूर्ण पाप माफ होतात, ते पुन्हा पाप करण्यासाठी नव्हे तर पापी जीवनातून मुक्तीसाठी हे पापक्षालन होते. कारण पापमय जीवनातून कोणतीतरी 'एक्झिट' उपलब्ध असणे आवश्यक असते. प्रत्येकवेळी प्रायश्चितच देणे शक्य नसते, आता पापमुक्ती शक्यच नाही, या कोंडीतून आपण सुटणारच नसल्याची भावना माणसाला आणखी पाप करण्यास प्रवृत्त करू शकते. म्हणून आता आपण पाप मुक्त झालो असून आता पुन्हा पाप करण्यापासून आपण बचावलो पाहिजे ही पवित्र भावना यातून जागी होते. याचे उदाहरण म्हणजे कुणाच्या स्वच्छ पांढऱ्याशुभ्र पोशाखावर एक दोन चिखलाचे डाग असतील तर त्यांना थोड्याशा पाण्याने धुऊन तो आणखी डाग लागू नये याची काळजी घेतो. पण हे डाग आता निघणारच नसल्याची त्याची खात्री झाली तर मात्र तो आणखी डाग लागण्याची काळजी घेत नाही तर सदरा असाही डागळलाच आहे, तसाही डागाळला तर हरकत काय म्हणून तो आणखीन मळका होऊ देतो, परंतु कुणी आपला तोच पोशाख स्वच्छ करून, इस्त्री करून नीटनेटका केला तर आता डाग पुरे, आता जपून राहायचं ही पावनतेची भावना माणसाला पावन बनवते. एखाद्याकडून एखादी चोरी झाली तर शिक्षा भोगल्यानंतरही  काही लोकं त्याला चोर चोर म्हणून त्याची हेटाळणी करतात आणि त्याला आणखीनच जास्त चोरी करण्यास अप्रत्यक्षपणे प्रवृत्त करतात. पण आपले सर्व पाप धुतले गेले आहेत, आपण पापशून्य झालो आहोत, आता एका नव्या जीवनाची सुरुवात करू या, ही भावना त्या माणसाला नवीन उमेद देते, आशेचा किरण दाखवते आणि त्याला अंधाराकडून सत्कर्माच्या उजेडाकडे आणते. खरं म्हणजे ही चांद रात रोजाधारकाच्या जीवनात एक नवीन पहाट उगविते आणि त्याचे संपूर्ण जीवनच ईदमय करून टाकते.

म्हणून आपण काय काय पाप केले आहे, याचे आत्मपरीक्षण करून या रात्री अल्लाहकडे त्यासाठी क्षमायाचना केली जाते, पुन्हा पाप करणार नाही, याचा संकल्प सोडला जातो, कुणाच्या भावना दुखावल्या असतील, कुणाचं काही नुकसान केले असेल, कुणाचा हक्क मारला असेल तर त्याची माफी मागून त्याच्या नुकसानीची किंवा हक्काची पूर्तता काही जण यानिमित्ताने करतात. म्हणून काही जण ईदच्या या पूर्वसंध्येला ''लैलत-उल-जायेजा (आत्मपरीक्षणाची रात्र)'' देहकही म्हणतात. परंतु ''लैलतूल जायेजा'' हा शब्द या रात्रीसाठी इस्लामी ग्रंथांत आला आहे कि नाही किंवा ज्या हदीस (प्रेषित वचन) मध्ये आला आहे, त्यांची अधिकृतता सत्य आहे कि नाही यासंबंधी इस्लामी विचारवंतात वाद आहेत  मात्र या रात्री रोजाधारकांचे पापक्षालन होते, हे मात्र निर्विवाद आहे.

या चांदरातला सर्वसाधारणपणे दुसऱ्या दिवशी येणाऱ्या तयारीत बरेच लोकं गुंतलेले असतात. शिरखुर्म्यासाठी दूध, फराळासाठीची तयारी, नवीन कपडे टेलरकडून आणायचे आणि इतर लगबग सुरु असते, पण ही सगळी तयारी आधीपासूनच करून ठेवायला हवी. कारण या चांद रातला आत्मपरीक्षण करणे महत्वाचे आहे, त्यासाठी वेळ काढायलाच हवा. कारण जीवनवृक्षाला लागलेल्या अपराधीपणाच्या ग्लानीचे सगळे किडलेले जीर्ण शीर्ण पर्ण गळून उद्याच्या नवीन पवित्र जीवनाची पालवी यावेळी फुटण्याची ही वेळ असते. तुमच्या आयुष्यातही शेकडो वेळा अशी आनंददायी चांद रात येवो, आमीन!

(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)

 

 

Web Title: Ramzan: What is Chand Raat?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.