जि.प., पं.स. निवडणुकीचा बिगूल वाजला
By Admin | Updated: June 5, 2015 00:47 IST2015-06-05T00:47:27+5:302015-06-05T00:47:27+5:30
मागील काही महिन्यांपासून निवडणुकीची तयारी सुरू केलेल्या राजकीय पक्ष आणि पदाधिकारी ही निवडणुकीच्या तारखेविषयी उत्सुक होते.

जि.प., पं.स. निवडणुकीचा बिगूल वाजला
भंडारा : मागील काही महिन्यांपासून निवडणुकीची तयारी सुरू केलेल्या राजकीय पक्ष आणि पदाधिकारी ही निवडणुकीच्या तारखेविषयी उत्सुक होते. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारला सायंकाळी भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या १५ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला.
त्यानुसार या निवडणुकीसाठी दि.३० जून रोजी मतदान आणि २ जुलै रोजी मतमोजणी होणार असून गुरुवारला मध्यरात्री १२ वाजतापासून आचारसंहिता लागू झाली आहे.
५२ सदस्यीय भंडारा जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या तुमसर, मोहाडी, भंडारा, पवनी, साकोली, लाखनी आणि लाखांदूर पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी निवडणूक होणार आहे. ग्रामीण भागात मागील काही महिन्यांपासूनच मोर्चेबांधणीला प्रारंभ झाला आहे.
रणसंग्राम प्रतिष्ठेचा अन अस्तित्त्वाचा
एका पाठोपाठ एक निवडणुका जिंकल्यानंतर मनोबल उंचावलेल्या भाजपला जिल्हा परिषदेत सत्ता टिकवून ठेवायची आहे तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला या निवणुका जिंकून अस्तित्त्व निर्माण करायचे आहे. त्यामुळे या निवडणुका भाजपसाठी प्रतिष्ठेची तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी अस्तित्वाची राहणार आहे. त्यासाठी भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा हे पक्ष इच्छुक उमेदवारांचे त्या भागातील प्रस्थ पाहूनच संधी देण्याच्या मानसिकतेत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
असा राहील निवडणूक कार्यक्रम
राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या कार्यक्रमानुसार, १० ते १५ जून या कालावधीत नामनिर्देशनपत्रे देण्यात येतील व स्वीकारली जातील. १६ जून रोजी नामनिर्देशनपत्रांची छानणी होईल. त्याच दिवशी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. नामनिर्देशन पत्रासंदर्भातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निणर्याविरुद्ध जिल्हा न्यायाधिशांकडे १९ जूनपर्यंत अपील करता येईल. अपील नसलेल्या ठिकाणी २२ जूनपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील व त्याचदिवशी तेथील निवडणूक रिंगणातील अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. अपील असलेल्या ठिकाणी २४ जूनपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील व त्याचदिवशी तेथेही निवडणूक रिंगणातील अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. मतदान केंद्राची यादी २४ जून रोजी प्रसिद्ध केली जाईल. ३० जून रोजी सकाळी ७.३० ते ५.३० या वेळेत मतदान होईल. दि. २ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.
कमी वेळेत उमेदवारांची परीक्षा
आचारसंहिता आजपासून लागेल उद्यापासून लागेल या प्रतिक्षेत असलेल्या पदाधिकाऱ्यांना आता उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठीकडे येरझारा माराव्या लागणार आहेत. ५ ते ३० जून या २५ दिवसाचा निवडणूक कार्यक्रम आहे. प्रत्येक पक्षांकडे उमेदवारीसाठी गर्दी सुरू आहे. अद्याप कुणाचीही उमेदवारी निश्चित नाही. त्यामुळे यासाठी किमान १० दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे १२ ते १४ दिवसात मोर्चेबांधणी करावी लागेल. रिंगणातील यादी प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांना केवळ सहा दिवस प्रचारासाठी मिळणार आहे.