जि.प. शाळांना येणार सेमी इंग्रजीचा ‘लूक’
By Admin | Updated: March 25, 2017 00:21 IST2017-03-25T00:21:25+5:302017-03-25T00:21:25+5:30
इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून दर्जेदार शिक्षण मिळत असल्याचा उहापोह आता सर्वश्रुत आहे.

जि.प. शाळांना येणार सेमी इंग्रजीचा ‘लूक’
भंडारा पंचायत समितीचा निर्णय : विद्यार्थ्यांना मिळणार इंग्रजी अध्यापनाचे धडे
प्रशांत देसाई भंडारा
इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून दर्जेदार शिक्षण मिळत असल्याचा उहापोह आता सर्वश्रुत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या रोडावत चालली आहे. विद्यार्थी टिकून राहावे, किंबहुना प्रत्येक विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत शिकावा यासाठी भंडारा पंचायत समितीने यावर पर्याय शोधला आहे. २०१७-१८ या शैक्षणिक सत्रापासून भंडारा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १३२ शाळेत पहिल्या वर्गापासून सेमी इंग्रजी माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्यापनाचे धडे दिले जाणार आहे. या स्तुत्य उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळा आता इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंट शाळांना ‘टेकओव्हर’ करण्यासाठी सज्ज होत आहेत.
भंडारा पंचायत समितीचे वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी शंकर राठोड यांच्या कल्पनेतून मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषद शाळा इंग्रजी माध्यमात झेप घेणार आहे. जिल्हा परिषदच्या शाळांची पटसंख्या वाढविणे, गुणवत्तापूर्ण पहिलीपासून अध्यापनाची सोय करून देणे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत इंग्रजी माध्यमाची सोय उपलब्ध करून देता यावी, यासाठी राठोड यांनी पंचायत समितीचे सभापती प्रल्हाद भुरे, गटशिक्षणाधिकारी शामकर्ण तिडके, केंद्रप्रमुख व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी यांच्यासमोर संकल्पना मांडली. बदलत्या काळासोबत आपण वेळीच परिवर्तन केला पाहिजे, असाच सूर सर्वांनी काढला. इंग्रजी माध्यमाच्या शाळांना मात देण्यासाठी सर्वानी पुढाकार घेऊन शैक्षणिक सत्र २०१७-१८ या वर्षापासून तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीपासून इंग्रजी माध्यमातून अध्यापन करण्याच्या निर्णयावर सर्वांनी शिक्कामोर्तब केला. जिल्हा परिषद शाळांमधील ऐतिहासिक बदल करण्याच्या प्रयत्नाची ‘गुढी’ भंडारा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने उभारल्याचे त्यांच्या वाटचालीवरून दिसून येत आहे. भंडारा पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदेच्या इयत्ता १ ते ७ च्या १३२ शाळा आहेत. सुसूत्रता व इंग्रजीतून मोफत शिक्षण मिळावे यासाठी जिल्हा परिषद शाळा सेमी इंग्रजी झाल्याचे पुढील सत्रापासून बघायला मिळेल, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे. पहिलीपासून शाळा सेमी इंग्रजी होणार, पण इंग्रजी माध्यमाची पुस्तके मिळणार का? ही भीती शिक्षक संघटनेकडून व्यक्त करण्यात आली. जिल्हा समन्वयक विरेंद्र गौतम यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून पुस्तकाची ग्वाही मिळल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पुढील वर्षासाठी १ हजार ८०० पुस्तकांचा पहिल्या वर्गासाठी संच लागेल. ‘सेमी इंग्रजी’च्या अध्यापनाने पुढीलवर्षी १३२ शाळा इंग्रजी माध्यमाच्या होणार आहे. यामुळे ‘मराठी’ची बिरूदावली आता मोडीत निघणार असून पुढील सत्रात, नवे विद्यार्थी, नवे शिक्षक, नवा ‘लूक’ विद्यार्थ्यांसह बघायला मिळणार असल्याने या शाळा आता जणू ‘कात’ टाकणार आहेत.
अध्यापनासाठी बुक लायब्ररी
भंडारा गटसमन्वय केंद्रातील फिरते शिक्षक सुधीर भोपे यांनी संगणकावर अध्यापन करण्यासाठी बुक लायब्ररी तयार केली आहे. ज्या शिक्षकांना शिकविण्यास अडचणी येणार आहेत. त्या शिक्षकांसाठी याचा लाभ घेता येणार आहे. सर्व शिक्षकांना ही माहिती मोफत पुरविली जाणार आहे
सेमी इंग्रजी शिक्षणाचे हे शिलेदार
या संकल्पनेला मूर्तरूप देण्यासाठी गटसाधन केंद्रात झालेल्या शिक्षक संघटनेच्या सभेत गटशिक्षणाधिकारी शामकर्ण तिडके, विस्तार अधिकारी शंकर राठोड, भंडारा पंचायत समितीचे केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, शिक्षक संघटनेचे नेते रमेश सिंगनजुडे, ईश्वर नाकाडे, सुधीर वाघमारे, रवी उगलमुगले, प्रभू तिघरे, नरेंद्र रामटेके, एस. ए. तुरकर, हरिकिसन अंबादे, गणेश शेंडे, श्रावण हजारे, नामदेव गभणे, धनराज साठवणे, सुभाष खंडाईत, धनराज वाघाये, अशोक भुरे, पटोले, शरद लांजेवार आदी उपस्थित होते.
कॉन्व्हेंटमुळे जि. प. शाळांवर प्रभाव पडला आहे. जि. प. शाळेत इंग्रजी शिक्षण सुरू झाले तर या शाळा भरभराटीस येतील. पटसंख्येत वाढ होईल. जि. प. शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी हा प्रयत्न शिक्षण क्षेत्रात नवा अध्याय निर्माण करेल.
- प्रल्हाद भुरे, सभापती, पं.स. भंडारा.
भंडारा तालुक्यात सर्वात जास्त इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. कॉन्व्हेंटकडे पालकांचा ओढा आहे. सामान्य व गरीब सर्वस्तरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी शिक्षण मिळावे हा यामागील प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे.
- श्यामकर्ण तिडके, गटशिक्षाणाधिकारी, पं.स. भंडारा.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत इंग्रजी माध्यमाचे शिक्षण उपलब्ध करून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षक उत्तम कार्य करेल. जिल्हा परिषद शाळेत परत समृध्दीचे दिवस येतील.
- शंकर राठोड, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, भंडारा.