जि.प. कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद
By Admin | Updated: October 21, 2015 00:37 IST2015-10-21T00:37:27+5:302015-10-21T00:37:27+5:30
शाखा अभियंत्यांच्या पदस्थापनेसंदर्भात व बदलीचे धोरणाविरोधात जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना ....

जि.प. कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद
प्रकरण असभ्य वर्तणुकीचे : सीईओंनी व्यक्त केली दिलगिरी
भंडारा : शाखा अभियंत्यांच्या पदस्थापनेसंदर्भात व बदलीचे धोरणाविरोधात जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चर्चेदरम्यान उद्धट वागणूक दिल्या प्रकरणी कर्मचाऱ्यांनी आज लेखणी बंद आंदोलन पुकारले. दरम्यान सायंकाळी उशीरा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत सीईओंनी दिलगिरी व्यक्त केल्याने संघटनेच्या वतीने लेखणी बंद आंदोलन मागे घेत असल्याचे कळविले.
जिल्हा परिषद प्रशासनाकडून लघु पाटबंधारे विभाग येथील कार्यरत शाखा अभियंता चकोले, हेडाऊ यांची १७ आॅक्टोबर २०१५ च्या आदेशानुसार पदस्थापना लघु पाटबंधारे उपविभाग पवनी येथे केली. मात्र सदर पदस्थापनेबाबत संबंधित शाखा अभियंता यांना कोणतीही सूचना देण्यात आली नाही. शासनाच्या बदलीच्या धोरणाविरोधात व केलेल्या स्थानांतरण संबंधात जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे पदाधिकारी कार्यकारी अभियंता यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी गेले. चर्चा सुरु असताना मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षाकडून कार्यकारी अभियंता यांना सभेसाठी बोलाविण्यात आले. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनाही चर्चेकरिता बोलाविले. तसेच संबंधित शाखा अभियंत्यांसंदर्भात केलेले स्थानांतरण योग्य आहे असे म्हटले. अभियंता यांना घरचे काम सांगितले नाही. तुम्ही संघटना मध्ये आणू नका अन्यथा संघटनांना नेस्तनाबूत करून टाकीन असे बोलून पदाधिकाऱ्यांचा अपमान केल्याचे जिल्हा परिषद कर्मचारी समन्वय कृती समितीचे म्हणणे आहे.
या संदर्भात सीईओ यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी उद्धट वागणूक केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेत लेखणी बंद आंदोलन पुकारले. त्यामुळे कामकाज ठप्प पडले. ग्रामीण भागातून आलेल्या नागरिक व अन्य पदाधिकाऱ्यांना काम बंद आंदोलनाचा फटका बसला. दरम्यान सायंकाळी उशिरा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत तोडगा निघाला. (प्रतिनिधी)