जि.प. पोटनिवडणुकीत बोरकर, कोकुर्डे विजयी
By Admin | Updated: November 24, 2014 22:51 IST2014-11-24T22:51:10+5:302014-11-24T22:51:10+5:30
पहेला आणि सिहोरा या दोन जिल्हा परिषद क्षेत्रातील रिक्त जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने मुसंडी मारली आहे. एक जागा कायम राखत आणि शिवसेनेकडे असलेली जागा हिरावत

जि.प. पोटनिवडणुकीत बोरकर, कोकुर्डे विजयी
जि.प. पोटनिवडणूक : शिवसेनेची जागा भाजपने हिरावली
भंडारा/सिहोरा : पहेला आणि सिहोरा या दोन जिल्हा परिषद क्षेत्रातील रिक्त जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने मुसंडी मारली आहे. एक जागा कायम राखत आणि शिवसेनेकडे असलेली जागा हिरावत आपला भाजपने वर्चस्व टिकवून ठेवले आहे.
पहेला क्षेत्रातून शिवसेनेच्या उमेदवारीवर निवडून आलेले दीपक गजभिये यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी राजीनामा दिला होता तर सिहोरा क्षेत्रातून भाजपच्या उमेदवारीवर निवडून आलेले शोभा चांदेवार यांचे निधन झाल्यामुळे या जागा रिक्त होत्या. ही निवडणूक रविवारला झाली आज मतमोजणी प्रक्रिया आटोपली.
अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या पहेला क्षेत्रात भाजपकडून किशोर बोरकर, शिवसेनेकडून यशवंत भोयर आणि काँग्रेसकडून नरेंद्र रामटेके असे तीन उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत भाजपचे किशोर बोरकर हे १,९२१ मतांनी विजयी झाले. बोरकर यांना ४,५३८, सेनेचे भोयर यांना २,६१७ तर काँग्रेसचे रामटेके यांना १,९९४ मते मिळाली. ‘नोटा’ ला १५४ मते मिळाली. असे एकूण ९,३०३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
भंडारा तहसील कार्यालयात मतमोजणी करण्यात आली. भाजपचे बोरकर यांच्या विजयाची घोषणा झाल्यानंतर भंडाऱ्यात विजयी जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी भाजपचे पदाधिकारी नितीन कडव, जिल्हा उपाध्यक्ष सुर्यकांत ईलमे, जिल्हा परिषदेचे सभापती अरविंद भालाधरे, आरीफ पटेल, प्रशांत खोब्रागडे, सुभाज आजबले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर पहेला येथे मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी महिला राखीव असलेल्या सिहोरा क्षेत्रात भाजपकडून आशा कोकुडे आणि काँग्रेसकडून कविता घोडीचोर असे दोनच उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत भाजपच्या आशा कोकुडे या १,८७७ मतांनी विजयी झाल्या. कोकुडे यांना ४,७४१ तर काँग्रेसच्या घोडीचोर यांना २,८६४ मते मिळाली. ‘नोटा’ ला १४७ मते मिळाली. असे एकूण ७,७५२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सिहोरा जिल्हा परिषद क्षेत्रात १३ गावांचा समावेश असून या निवडणुकीत १७ बुथ होते.
तुमसर तहसील कार्यालयात मतमोजणी करण्यात आली. भाजपचे कोकुडे यांच्या विजयाची घोषणा झाल्यानंतर तुमसरात विजयी जल्लोष साजरा करण्यात आला. त्यानंतर सिहोरा येथे मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत पंचायत समितीचे सभापती कलाम शेख, हिरालाल नागपूरे, बंटी बानेवार, बळीराम भोंगाडे, मच्छेराचे सरपंच योगेश कोकुडे, बबलू शरणागत यांच्यासह भाजपचे पदाधिकारी सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी/वार्ताहर)