जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन
By Admin | Updated: September 9, 2014 23:14 IST2014-09-09T23:14:49+5:302014-09-09T23:14:49+5:30
जिल्हा परिषद उपाध्यक्षांचे स्विय सहायक मनिष वाहाने यांना जिल्हा परिषद महिला सदस्या हंसा खोब्रागडे यांनी शिविगाळ करून मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी आज जिल्हा परिषद कर्मचारी

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन
भंडारा : जिल्हा परिषद उपाध्यक्षांचे स्विय सहायक मनिष वाहाने यांना जिल्हा परिषद महिला सदस्या हंसा खोब्रागडे यांनी शिविगाळ करून मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी आज जिल्हा परिषद कर्मचारी समन्वय कृती समितीच्या माध्यमातून लेखणीबंद आंदोलन करण्यात आले. याचा फटका ग्रामिण भागातून आलेल्या नागरिकांना बसला. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे शेकडो फाईल कपाटबंद असल्याने कामकाज होऊ शकले नाही. दरम्यान सायंकाळी यात तोडगा निघाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
जिल्हा परिषद कर्मचारी कृती समितीने काळ्या फिती लावून काल घटनेचा निषेध केला होता. खोब्रागडे यांनी तक्रार परत घेऊन दिलगीरी व्यक्त करावी, अशी भुमिका संघटनेने घेतली. सोमवारी यावर कुठलाही तोडगा न निघाल्याने आजपासून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन सुरू केले. कर्मचारी कार्यालयात उपस्थित होते. मात्र आंदोलनामुळे शेकडो फाईल कपाटबंद असल्याने अधिकारीवर्गही कामाविना त्यांच्या कक्षात बसून असल्याचे दिसून आले. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांना बसला. त्यांना आल्यापावलीच परतावे लागले. दररोज एका विभागातून किमान ३५ फाईल वरिष्ठांच्या स्वाक्षरीकडे पाठविण्यात येते. मात्र आंदोलनामुळे आज एकही फाईल कपाटातून बाहेर काढण्यात आली नाही. लेखणीबंद आंदोलनामुळे किमान ५०० फाईलचे काम रखडले.
लेखणीबंद आंदोलनाला महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकाऱ्यांनीही पाठिंबा दिला. यावर तोडगा निघाला नाही तर उद्यापासून जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीमधील कर्मचारी लेखणीबंद आंदालनात सहभागी होणार होते. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागणार असल्याने यात तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष वंदना वंजारी, उपाध्यक्ष रमेश पारधी यांच्या पुढाकारातून बैठक बोलाविण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य भरत खंडाईत, बाबुजी ठवकर, डॉ. उल्हास बुराडे कर्मचारी समन्वय कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. यात खोब्रागडे यांनी तक्रार मागे घेण्याचे कबूल केले व दिलगिरी व्यक्त केल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)