जिल्हा परिषद शाळेला समस्यांचा विळखा!

By Admin | Updated: April 12, 2015 01:15 IST2015-04-12T01:15:44+5:302015-04-12T01:15:44+5:30

तालुक्यातील माडगी(टेकेपार) येथील जिल्हा परिषद शाळेला शैक्षणिक क्षेत्रात खूप महत्त्व प्राप्त झाले आहे.

Zilla Parishad school has problems! | जिल्हा परिषद शाळेला समस्यांचा विळखा!

जिल्हा परिषद शाळेला समस्यांचा विळखा!

भंडारा : तालुक्यातील माडगी(टेकेपार) येथील जिल्हा परिषद शाळेला शैक्षणिक क्षेत्रात खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. या शाळेत शिकणारे अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली; मात्र अलीकडच्या काळात या शाळेच्या विविध समस्येमुळे दयनीय अवस्था झाल्याचे चित्र आहे.
धारगाव केंद्रतंर्गत असलेल्या येथील शाळेत सहा वर्ग खोल्यांपैकी एकच वर्गखोली सुव्यवस्थित आहे. माकडांनी कवेलु तोडल्यामुळे छतांची दुरवस्था झाली आहे. पावसाचे पाणी वर्गखोलीत पडते. त्यामुळे शिक्षण घेण्यात मोठा अडसर निर्माण होत आहे. छतांच्या दुरवस्थामुळे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. शाळेची गतकाळातील कामगिरी लक्षात घेता, अनेक पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी या शाळेकडे आवर्जून धाव घेतात; मात्र अलीकडील काळात या शाळेला समस्यांनीे घेरल्यामुळे दर्जा दिवसेंदिवस ढासळत चालला असल्याचे दिसून येते. आपल्या पाल्याला सुयोग्य शिक्षण मिळावे, अशी प्रत्येक पालकाची रास्त अपेक्षा असते; मात्र या ठिकाणी जीर्ण इमारतीमुळे पालकांचा हिरमोड होत आहे. उल्लेखनीय बाब अशी की, या शाळेमध्ये बहुतांश विद्यार्थी हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत. परिणामी, तेथील उपलब्ध शिक्षकांकडून जेवढे शक्य आहे, तेवढ्या केल्या जाणाऱ्या मार्गदर्शनावर अवलंबून राहण्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही. या शाळेतील अनेक शिक्षक, कर्मचारी बाहेरगाववरून ये-जा करतात. त्यामुळे ते वेळेवर पोहोचतील, याची अपेक्षा करणे म्हणजे दिवास्वप्नच म्हणावे लागेल. याशिवाय परिसरात सर्वत्र अस्वच्छता पसरल्याने मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत असते. त्यामुळे आरोग्यविषयक समस्या उदभवू शकते. छतांच्या दुरवस्थामुळे वर्गात विद्यार्थी बसविणे अवघड झाले आहे. शाळेची इमारत दुरुस्त करण्यात यावी, असा ठराव शाळा व्यवस्थापन समितीनी घेतला आहे. तसा ठराव जिल्हा परीषदेला पाठविण्यात आला. शाळेची इमारत तातडीने दुरुस्त करण्यात यावी, अशी मागणी चांगदेव येळणे, अंबरदास मेश्राम, मेश्राम, दामोधर ढोणे व पदाधिकाऱ्यांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Zilla Parishad school has problems!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.