भंडारा : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटना कडून राज्य कार्यकारणीची सभा छत्रपती शिवाजी महाराज सभागृह जिला परिषद अहमदनगर येथे पार पडली. अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्याध्यक्ष गिरीश दाभाडकर हे होते. सभेत लिपीक शिरोमणी, बापुसाहेब कुलकर्णी, बाळासाहेब टिळे, सचिन मगर, उमाकांत सुर्यवंशी, जितेंद्र देसाई, सागर बाबर, प्रभु मते, केसरीलाल गायधने, यशवंत दुनेदार तसेच राजभरातून संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. सदर सभा राज्य शासनाने लिपिकांचे ग्रेड पे संदर्भात नकारात्मक भूमिका घेतल्याने तातडीने आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली. यावेळी राज्यभरातील लिपिकांच्या भावना तीव्र होत्या. सभेत कनिष्ठ सहायक, वरिष्ठ सहायक, कार्यालयीन अधीक्षक, कक्ष अधिकारी यांचे ग्रेड वेतन सुधारणेसंदर्भात आंदोलनाची दिशा ठरविणेबाबत, लिपिकांसाठी बदल्यांबाबत शासन निर्णयात दुरुस्ती करणे, लिपिकांना स्वतंत्र जॉबचार्ट मिळणेबाबत, एनआरएचएम चे कामावर बहिष्कार टाकणेबाबत, रत्नागिरी जिल्ह्यातील लिपिकास झालेल्या मारहाणीचा निषेध करणे, शालेय पोषण आहार योजनेसाठी डाटा एन्ट्री आॅपरेटर नेमणूक करणे, राज्यातील सर्व लिपीक एकत्र करणे, पदोन्नतीनंतर त्यापदाचे किमान मूळ वेतन पदोन्नतीधारकास मिळणेबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी सर्व लिपिकांनी ग्रेड वेतन सुधारणेसंदर्भात तीव्र आंदोलन करुन शासनाकडून सदर मागणी मान्य करुन घ्यावी, याबाबत आग्रही भुमिका मांडली. लिपीक शिरोमणी राज्य सचिव बापुसाहेब कुलकर्णी यांनी आझाद मैदान मुंबई येथे दि. ३ ते ४ मे पर्यंत लाक्षणिक उपोषण करण्याचे जाहिर केले. दि. ४ मे रोजी सदर उपोषणास पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून पाच ते दहा हजार लिपीक कर्मचारी उपस्थित राहून सदर आंदोलनास पाठिंबा देणार आहेत. दि. ४ मे रोजी आयोजित उपोषणाला राज्यातील सर्व लिपिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राज्याध्यक्ष गिरीश दाभाडकर यांनी आयोजित सभेत केले. (नगर प्रतिनिधी)
जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांची सभा
By admin | Updated: April 16, 2016 00:27 IST