जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी केले काळ्या फिती लावून कामकाज

By Admin | Updated: September 9, 2014 00:08 IST2014-09-09T00:08:57+5:302014-09-09T00:08:57+5:30

जिल्हा परिषद उपाध्यक्षांचे स्विय सहायक मनिष वाहाने कर्तव्यावर असताना जिल्हा परिषद महिला सदस्या हंसा खोब्रागडे यांनी शिविगाळ केली. घटनेची दोघांनीही परस्परांविरूध्द तक्रार दिली आहे.

Zilla Parishad employees took the black ribbon and performed them | जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी केले काळ्या फिती लावून कामकाज

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी केले काळ्या फिती लावून कामकाज

परस्परांविरोधात तक्रार : प्रकरण महिला पदाधिकाऱ्यांनी शिवीगाळ केल्याचे
भंडारा : जिल्हा परिषद उपाध्यक्षांचे स्विय सहायक मनिष वाहाने कर्तव्यावर असताना जिल्हा परिषद महिला सदस्या हंसा खोब्रागडे यांनी शिविगाळ केली. घटनेची दोघांनीही परस्परांविरूध्द तक्रार दिली आहे. या प्रकरणी आज जिल्हा परिषद कर्मचारी समन्वय कृती समिती व महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने काळ्या फिती लावून घटनेचा निषेध नोंदविला.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रमेश पारधी यांचे स्विय सहायक म्हणून वरिष्ठ सहायक मनिष वाहाने जबाबदारी सांभाळीत आहे. वाहाने गुरूवारी कर्तव्यावर असताना दुपारी १२ वाजताच्या सुमारास जिल्हा परिषद सदस्या हंसा खोब्रागडे यांनी त्यांना उपाध्यक्षांच्या कक्षात बोलाविले. वाहाने येताच खोब्रागडे यांनी बांधकाम समितीच्या सभेबाबत विचारणा करून अश्लील शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. कुठलेही कारण नसताना महिला सदस्याच्या या पवित्र्याने वाहाने यांची भंबेरी उडाली. सदर महिला सदस्या एवढ्यावरच न थांबता त्यांनी वाहाने यांना, कक्षाबाहेर या म्हणून हातवारे केले व मारण्यास अंगावर धावून गेल्याची माहिती वाहाने यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवदेनातून केली आहे.
खोब्रागडे यांनी वाहाने यांच्याविरोधात गुरूवारीच भंडारा पोलिसात तक्रार दाखल केली. तर वाहाने यांनीही त्यांच्याविरोधात शुक्रवारी तक्रार दाखल केली. दोघांच्या परस्परविरोधात तक्रारीने पोलिसांनी प्रकरण चौकशीत ठेवले आहे. खोब्रागडे यांच्या अरेरावीच्या प्रकरणामुळे यापूर्वी पवनी तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी निषेध नोंदविण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे वाहाने यांच्याविरोधातही त्यांनी खोटी तक्रार दाखल करून त्यांना फसविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप जिल्हा परिषद कर्मचारी समन्वय कृती समितीचे अध्यक्ष प्रभाकर कळंबे यांनी केला आहे.
आंदोलनाला महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने पाठिंबा दिला आहे. कर्मचाऱ्यावर अन्याय होऊ नये या भूमिकेला महासंघाचा पाठिंबा आहे. सायंकाळी या विषयावर नाट्यमयरीत्या समझोता होवून दोघांनीही तक्रार मागे घेण्याचा तोडगा काढल्याची माहिती जि.प. सदस्या हंसा खोब्रागडे यांनी लोकमतला दिली. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Zilla Parishad employees took the black ribbon and performed them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.