जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग झोपेत
By Admin | Updated: May 25, 2017 00:20 IST2017-05-25T00:20:29+5:302017-05-25T00:20:29+5:30
शिर्षक वाचून दचकलातं ना? आणि शिर्षकानुसार बातमी वाचायला उत्सूकता लागली असेल. होय, शिक्षण विभाग झोपेतच आहे, ...

जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग झोपेत
अपिलीय अधिकारी जूनेच : चार महिन्यांचा कालावधी लोटला
प्रशांत देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शिर्षक वाचून दचकलातं ना? आणि शिर्षकानुसार बातमी वाचायला उत्सूकता लागली असेल. होय, शिक्षण विभाग झोपेतच आहे, असेच सध्याचे चित्र येथे आहे. चार महिन्यापूर्वी येथे शिक्षणाधिकारी (प्राथ.) म्हणून रविकांत देशपांडे रूजू झालेत. मात्र, शिक्षण विभागाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या माहिती अधिकाराचे अपिलीय अधिकारी म्हणून आजही तत्कालीन शिक्षणाधिकारी ए. व्ही. परिहार यांचेच नाव आहे. त्यामुळे श्यू..... शिक्षण विभाग झोपेत आहे, असेच म्हणावे लागेल.
जिल्हा परिषदच्या इमारतीत दुसऱ्या माळ्यावर शिक्षण विभागाचे कार्यालय आहे. दररोज नवनविन फाईल्स, व नानाविध कामांचा पाठपुरावा करून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची महत्वाची जबाबदारी शिक्षण विभागाची आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक) यांना मागिल काही वर्षांपासून नियमित शिक्षणाधिकारी प्राप्त झालेले नाही. त्यामुळे प्रभारींवरच येथील शिक्षण विभागाचे काम सुरू आहे. माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी किसन शेंडे यांच्याकडे काही दिवस प्राथमिक विभागाचा प्रभार देण्यात आला होता. त्यांचे वर्धा येथे स्थानांतरण झाल्यानंतर प्राथमिक विभागाचा प्रभार डायटचे प्राचार्य अभयसिंग परिहार यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यामुळे भंडारा जिल्हा परिषदच्या प्राथमिक शिक्षण विभागाची प्रभारींची परंपरा सध्याही कायम आहे.
परिहार यांना नियमानुसार प्रभार देता येत नसतानाही त्यांना प्रशासकीय जबाबदारी सोपविण्याचा अफलातून प्रकार जिल्हा परिषदमध्ये घडला. याला जिल्हा परिषद सभागृहात विरोध झाला, मात्र एैकेल कोण? नागपूर येथील रविकांत देशपांडे यांची भंडारा स्थानांतरण झाल्याने परिहार यांच्याकडून त्यांनी प्रभार घेतला. देशपांडे हे भंडारा येथे २७ जानेवारी २०१७ ला रूजू झालेत. याला आता चार महिन्यांचा कालावधी लोटत आहे. या चार महिन्यात प्राथमिक शिक्षण विभागात मोठे फेरबदल झालेत. काही निर्णयामुळे वादळ निर्माण झाले, यात शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचे वादळ घोंगावत आहे.
अशा या शिक्षण विभागाच्या प्रवेशद्वारालगत केंद्रीय माहितीचा अधिकार २००५ संबंधी बोर्ड लागला आहे. या बोर्डवर आजही अपिलीय अधिकारी म्हणून प्रभारी शिक्षणाधिकारी ए. व्ही. परिहार यांचे नाव लिहिलेले आहे. तर महिती अधिकारी म्हणून जनमाहिती अधिकारी तथा कक्षाधिकारी नलीनी डोंगरे व सहायक महिती अधिकारी म्हणून अधिक्षक आर. आर. तरोणे यांचे नाव लिहिलेले आहे. वास्तविकतेत रविकांत देशपांडे यांना येथे रूजू होऊन चार महिन्यांचा कालावधी होत आहे. त्यामुळे अपिलीय अधिकारी म्हणून परिहार यांच्या ऐवजी देशपांडे यांचे नाव लिहिने आवश्यक आहे. मात्र, झोपेत असलेल्या शिक्षण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना याची जाणीवच नाही, ही खरी शोकांतिका आहे.
प्रवेशद्वारातच गोंधळ
प्रवेशद्वाराच्या एकाबाजूला माहिती अधिकाराच्या बोर्डवर अपिलीय अधिकारी म्हणून परिहार यांचे नाव तर दुसऱ्या बाजूला प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून आर. पी. देशपांडे यांच्या नावाची पाटी लागली आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या जाणाऱ्यांचा मोठा गोंधळ उडतो. याच प्रवेशद्वारातून दररोज शिक्षणाधिकारी, कक्षाधिकारी, अधिक्षक यांच्यासह येथील कर्मचारी व कर्मचाऱ्यांचे सर्व शुभचिंतक आवागमन करता. त्यामुळे यातील कुणाचेच याकडे लक्ष जावू नये, हे आश्चर्यम्चं म्हणावे लागेल.
जबाबदारी कुणाची?
शिक्षण विभागातील सर्व कामे शिक्षणाधिकारी यांनी केलीच पाहिजे, असे नाही. कार्यालयाचा व्याप जास्त असल्याने येथे कक्षाधिकारी, अधिक्षक यांची नियुक्ती केली असून यांच्याकडे कार्यालयाची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे काही छोट्यामोठ्या बाबींकडे लक्ष देण्याची जबाबदारी त्यांच्यावर येथे. मात्र, या सर्वांवर शिक्षणाधिकारी यांचे नियंत्रण असणे गरजेचे आहे. याबाबत सर्व एकमेकांकडे अंगूलीनिर्देश करून स्वत:च्या जबाबदारीतून सुटण्याचा प्रयत्न करीत आहेत.