जिद्द, कष्टातून गाठले यशोशिखर
By Admin | Updated: April 7, 2015 01:24 IST2015-04-07T00:48:20+5:302015-04-07T01:24:04+5:30
एमपीएससी परीक्षेत यश : सर्वसामान्य कुटुंबातील मुलांची कामगिरी

जिद्द, कष्टातून गाठले यशोशिखर
कोल्हापूर : जिद्द, कष्ट आणि चिकाटी या त्रिसूत्रीच्या जोरावर कोल्हापूर जिल्ह्यातील मध्यमवर्गीय, सर्वसामान्य कुटुंबातील तरुण-तरुणींंनी राज्य लोकसेवा आयोगाच्या अंतिम परीक्षेत यश मिळविले आहे. यशोशिखर गाठण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट,
केलेले प्रयत्न ‘लोकमत’शी बोलताना मांडले.
कुटुंबीयांचा विश्वास सार्थ ठरविला
‘यूपीएससी’च्या मुख्य परीक्षेत दोनवेळा अपयशी ठरलो; पण कुटुंबीयांचा दृढ विश्वास माझ्यावर होता. तहसीलदार पदाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्यांचा विश्वास सार्थ ठरविल्याचा आनंद होत आहे. माझं मूळ गाव पेठवडगाव. वडील शासकीय सेवेत असल्याने सध्या कोल्हापुरातील युनिक पार्कमध्ये राहते. कुटुंबीयांची इच्छा होती की, शासकीय सेवेत मी करिअर करावे. त्यासाठी प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण घेऊ लागले. तेथील तयारीच्या जोरावर ‘यूपीएससी’च्या मुख्य परीक्षेपर्यंत धडक मारली; पण काही गुणांनी अपयश आले. मात्र, अभ्यास सोडला नाही. गटचर्चा आणि लॉजिकवर भर देऊन तयारी केल्याने सहायक गटविकास अधिकारी पदाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. मात्र, त्या पदावर रूजू न होता पुन्हा अभ्यास सुरू केला आणि त्यामुळे आता तहसीलदारपदाच्या परीक्षेत यश मिळविता आले. - श्वेता शशिकांत पाटोळे
५आईने बळ दिले...
माझे मूळ गाव चिपळूण (रत्नागिरी) पण, माझा जन्म झाला कोल्हापुरातील उचगावमधील उफळे कॉलनीत. वडिलांचे निधन झाल्यानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी आई लता यांनी पेलली. शिक्षणासाठी तिने पाठबळ दिले. पदवीचे शिक्षण घेताना स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. त्याच्या जोरावर २०१२-१३ मध्ये ‘यूपीएससी’च्या मुलाखतीपर्यंत धडक दिली; पण सहा गुणांनी संधी हुकली. या अपयशाने जिद्द सोडली नाही. अभ्यासात सातत्य ठेवत युनिक अकॅडमीमध्ये दोन वर्षे कोचिंग केले. सध्या विजेता अकॅडमी, प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटरमध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून जात होतो. त्यासह दिवसांतील सात तास अभ्यास आणि तीन तास गटचर्चा करत होतो. त्याची उपजिल्हाधिकारीपदाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी मदत झाली. ‘आयएएस’चे माझे ध्येय असून, ते साध्य करण्यासाठी यापुढे प्रयत्न राहणार आहेत.
- गणेश भिकाजी महाडिक