रेल्वेतून पडून युवकाचा मृत्यू
By Admin | Updated: August 31, 2015 00:29 IST2015-08-31T00:29:39+5:302015-08-31T00:29:39+5:30
प्रवासी गर्दीमुळे एका प्रवाशाला रेल्वे स्थानकावर उतरतानी विलंब झाला. अशातच गाडी सुरु झाली. चालत्या गाडीतून उतरण्याच्या प्रयत्नात एका प्रवाशाचा पाय घसरल्याने तो गाडीखाली पडला.

रेल्वेतून पडून युवकाचा मृत्यू
तुमसर : प्रवासी गर्दीमुळे एका प्रवाशाला रेल्वे स्थानकावर उतरतानी विलंब झाला. अशातच गाडी सुरु झाली. चालत्या गाडीतून उतरण्याच्या प्रयत्नात एका प्रवाशाचा पाय घसरल्याने तो गाडीखाली पडला. यात प्रवाशाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. लक्ष्मीकांत संभूलाल येळे (३४) रा. पालोरा (करडी) असे मृताचे नाव आहे. ही दुर्दैवी घटना शनिवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास तुमसर रोड रेल्वे स्थानकावर घडली.
लक्ष्मीकांत येळे हे गोंदियाहून तुमसर येथे समता एक्स्प्रेसने येत होते. प्रवाशी डब्यात प्रचंड गर्दी होती. तुमसर रोड येथे गाडी थांबल्यावर येळे यांना उतरतांना वेळ लागला. इतक्यात पुन्हा गाडी सुरु झाली. तुमसररोड रेल्वे स्थानकावर समता एक्स्प्रेसचा केवळ दोन मिनिटांचा थांबा आहे. चालत्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्नात येळे यांचा पाय घसरला व ते गाडीखाली पडले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी रात्री तुमसर रोड रेल्वे स्थानकावर काका लाडसे या इसमाचा अपघातात मृत्यू झाला होता. रेल्वेचा प्रवास सुरक्षित प्रवास अशी हमी रेल्वे प्रशासन देते, परंतु मागील काही महिन्यापासून तुमसर रोड रेल्वे स्थानकावर अपघातात सातत्याने वाढ होत आहे.तुमसर स्थानकावर जलद प्रवाशी गाड्यांचा थांबा आहे. केवळ दोन मिनिटात प्रवाशांना चढणे व उतरणे शक्य होत नाही. येथे थांब्याच्या वेळेत वाढ करण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)