लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मोहाडी तालुक्यातील एका विद्यार्थिनीच्या घरी जाऊन पोलिस पाटलाने तिला नक्षलवादी संबोधले. एवढेच नाही तर, तिचे आधारकार्ड मागून यापुढे अशा संघटनेशी संबंध ठेवायचे नाहीत, अशी तंबीही दिली. अॅन्टी नक्षल सेलच्या सांगण्यावरून संबंधित पोलिस पाटलाने घरी जाऊन आधारकार्डची मागणी केली, असा आरोप होत आहे. मात्र पोलिसांनी हे आरोप निराधार असल्याने म्हटले आहे. या घटनेमुळे हे कुटुंब आणि विद्यार्थिनी दहशतीत आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी एआयएसएफ (ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन) संघटनेशी जुळलेली असून सध्या नागपुरात शिकते. ८ सप्टेंबरच्या रात्री भंडारा पोलिसांच्या नक्षलविरोधी पथकाने या विद्यार्थिनीच्या घरी एका पोलिस पाटलांना पाठविले. त्यांची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड तातडीने द्या, अशी मागणी कुटुंबीयांना केली. मात्र, पोलिस पाटलाकडे तसे कोणतेही पत्र नसल्याने कुटुंबियांनी आधारकार्ड देण्यास नकार दिला.
दरम्यान, एआयएसएफचे राज्य अध्यक्ष वैभव चोपकर यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. ते म्हणाले, नक्षलविरोधी पथकाचे संदीप रहांगडाले यांनी संघटनेशी संबंधित कार्यकर्त्यांची वैयक्तिक माहिती आपणास मागितली होती, परंतु लेखी आदेश नसल्याने त्यांनी दिली नाही. त्यानंतरही पोलिस पाटलांना विद्यार्थिनीच्या घरी पाठवून धमकविण्यात आले. हा प्रकार चुकीचा असून, याप्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात, शहानिशा करण्यासाठी मोहाडीचे पोलिस निरीक्षक बेलखेडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नक्षल सेलमधील अन्य अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांक दिला. मात्र संबंधितांनी कॉल रिसिव्ह केला नाही.
प्रकाराची चौकशी करू - नुरुल हसन
यासंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक नुरूल हसन यांना विचारणा केली असता, पोलिसांकडून सर्वच संघटनांची गोपनीय माहिती ठेवली जाते. मात्र या प्रकरणात, पोलिस पाटलाने नक्षल आरोप लावला आहे की काय, याची चौकशी करू, असे त्यांनी सांगितले.
माओ आणि मार्क्सवाद समजून घ्यावा : चोपकर
एआयएसएफ ही देशातील मार्क्सवादी विचारसरणीशी संबंधित सर्वांत जुनी विद्यार्थी संघटना आहे. पोलिस या संघटनेच्या विद्यार्थ्यांना नक्षलवादी संबोधून त्रास देत असतील तर, त्यांनी आधी माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजून घ्यावा, असे एआयएसएफचे राज्य अध्यक्ष वैभव - चोपकर यांनी म्हटले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन स्वतः विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षांतील मार्गदर्शनासाठी पुढाकार घेत असताना पोलिस कर्मचाऱ्यांनी असा प्रकार करणे योग्य नव्हे, असेही त्यांनी म्हटले आहे.