बँकिंग क्षेत्रात तरुणांनी भविष्य घडवावे
By Admin | Updated: May 18, 2017 00:39 IST2017-05-18T00:39:45+5:302017-05-18T00:39:45+5:30
बदलत्या काळाच्या परिस्थितीत विकास केंद्रीत उपक्रमात बँक सेवा व उद्योग सेवा आर्थिक विकासामध्ये मोठा योगदान देत आहे.

बँकिंग क्षेत्रात तरुणांनी भविष्य घडवावे
देवगीरकर यांचे आवाहन : कौशल्य विकासावर प्रशिक्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : बदलत्या काळाच्या परिस्थितीत विकास केंद्रीत उपक्रमात बँक सेवा व उद्योग सेवा आर्थिक विकासामध्ये मोठा योगदान देत आहे. या सेवामध्ये उत्तम कौशल्य पूर्ण मनुष्य बळाच्या सतत गरज असणार आहे. मात्र ग्रामीण युवक या क्षेत्राकडे दुर्लक्ष करीत आहेत. भविष्यात बँकींग, फायनान्स, इन्व्हेस्टमेंट व टेंक्सेसन या क्षेत्रामध्ये युवकांनी आपले भविष्य घडविणे काळाची गरज आहे, असे आवाहन नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी संदीप देवगीरकर यांनी केले.
कौशल्य आधारित वाणिज्य व्यवस्थापन प्रशिक्षण प्रसंगी ते बोलत होते.
ग्रामीण विकास प्रागतिक मंडळ, भंडारा द्वारा भंडाऱ्याच्या जिल्ह्यातील वाणिज्य शाखेतील पदवीधर विद्यार्थ्यांकरीता २० दिवसांचे येथील ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाच्या प्रशिक्षण सभागृहामध्ये कौशल्य आधारित वाणिज्य व्यवस्थापन प्रशिक्षणाचे उद्घाटन उद्योगपती रामविलास सारडा यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे अध्यक्ष अॅड.संजीव गजभिये, प्रशिक्षण कार्यक्रमाचे मुख्य प्रशिषक सी.ए. पंकज मुंदडा तसेच संस्थेचे सचिव अविल बोरकर व संस्थेचे कोषाध्यक्ष पृथ्वीराज शेंडे आदी उपस्थित होते. यावेळी संदीप देवगीरकर म्हणाले, बँकींग क्षेत्रातील नवीन नवीन बदल लोकांनी समजवून घेण्याची गरज आहे. तसेच सध्या निर्माण झालेल्या जीएसटी बद्दल महत्वाची जाणीव जागृती समाजापुढे करण्याची जबाबदारी या क्षेत्रातील सर्व घटकांची आहे. त्यामुळे अशा प्रशिक्षणामधून युवकांना नवीन अनुभव घेण्याची मोठी संधी संस्थेनी करून दिली. सारडा यांनी आपल्या उद्घाटन मार्गदर्शनात अकाउंटींग क्षेत्रामध्ये कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची खूप गरज दर्शविली. अशा प्रशिक्षणामधून ती उणीव भरून काढण्यास मदत होईल. संस्थेनी या उपक्रमाकरिता विद्यार्थ्यांना घडविण्यास वेगवेगळ्या नवीन कार्यपद्धती आखून प्रशिक्षीत करावे असे त्यांनी आवाहन केले.
प्रशिक्षण कार्यक्रमाला भंडारा परिसरातील २६ युवक युवतींनी हजेरी नोंदविली. संचालन मिलींद गजभिये, प्रास्ताविक अविल बोरकर, प्रशिक्षणाचे विषय व त्याचे महत्व सी.ए. पंकज मुंदडा यांनी सांगितले. आभार प्रदर्शन पृथ्वीराज शेंडे यांनी केले. कार्यक्रमासाठी विवेक नंदनवार, सागर बागडे, गिरीश बंसोड यांनी सहकार्य केले.