तुमसरात मूलभूत सोयींचा अभाव
By Admin | Updated: September 9, 2014 00:10 IST2014-09-09T00:10:46+5:302014-09-09T00:10:46+5:30
तुमसर शहराची वाढ अत्यंत झपाट्याने होत असली तरी मूलभूत सोयी त्या वेगाने उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. नवीन तुमसर शहरामध्ये विनोबा नगर, श्रीराम नगर, दुर्गा नगर, इत्यादी नवीन वसाहती

तुमसरात मूलभूत सोयींचा अभाव
तुमसर : तुमसर शहराची वाढ अत्यंत झपाट्याने होत असली तरी मूलभूत सोयी त्या वेगाने उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. नवीन तुमसर शहरामध्ये विनोबा नगर, श्रीराम नगर, दुर्गा नगर, इत्यादी नवीन वसाहती निर्माण झालेल्या आहेत. परंतु यापैकी कोणत्याही नगरात परिपूर्ण सोयी सुविधा उपलब्ध नाहीत.
विनोबा नगर व श्रीराम नगर याठिकाणी थोड्या प्रमाणात पाऊस पडला तरी रस्त्यावर पाणी साचते. रस्त्यांनी ये-जा करण्यासाठी लोकांना त्रास सहन करावा लागतो. आवश्यक त्या प्रमाणात रस्ते बांधकामही पूर्ण अवस्थेत नाहीत. रस्त्यावरील पाणी लोकांच्या घरामध्ये शिरतो, कारण पाणी वाहून नेण्यासाठी नाल्या नाहीत. काही ठिकाणी नाल्याचे बांधकाम झालेले आहे. परंतु नाल्या कचऱ्याने तुडूंब भरलेल्या आहेत. नाल्यांची सफाई वेळेवर होत नसल्यामुळे नाल्यातील घाण पाणी लोकांच्या घरात शिरत असल्याने आरोग्याची समस्या बळावली आहे. जागोजागी रिकाम्या असलेल्या भुंखडाला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यामुळे डास व इतर किटकांमुळे नागरिकांना आरोग्यविषयक समस्या भेडसावत आहेत. साचलेले पाणी व त्यामुळे डासांच्या संख्येत झालेली वाढ नागरिकांच्या जीवावर बेतलेली आहे. या परिसरात डेंग्यूचे रुग्ण आढळले असून सुद्धा लोकप्रतिनिधी व नगरपालिका प्रशासन सुस्तावस्थेत असल्याचे जाणवते. या परिसरातील प्रतिनिधींना लोकांच्या समस्येविषयी जाणून घेण्यात व सोडविण्यात काहीही रस नाही.
वारंवार अर्ज विनंत्या करूनसुद्धा लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाही. मागील काही दिवसापासून विजेचा लपंडाव सुरु झालेला आहे. त्यामुळे लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी पथदिवे लावलेले आहेत. परंतु त्यापैकी अर्धेअधिक बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे लोकांना आपल्या घरापर्यंत पाण्यातून व चिखलातून वाट करत जावे लागते. काही ठिकाणी अजूनही पक्के रस्ते बांधण्यात आलेले नाही. कच्चे रस्ते चिखलमय झालेले आहे. रस्त्यावर अजूनही मुरुम टाकण्यात आलेले नाही. काही प्रतिनिधी जाणून लोकांच्या समस्येकडे डोळेझाक करीत आहेत. कित्येक वर्षापासून पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. नळयोजना राबविताना वर्षानुवर्षे निघून गेली परंतु लोक तहानलेलेच. अजूनही लोकांच्या घरापर्यंत पाणी पोचविण्यात प्रशासन अपयशीच ठरलेले आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)