तुमसरात बर्निंग बाईकचा थरार
By Admin | Updated: December 27, 2015 00:48 IST2015-12-27T00:48:42+5:302015-12-27T00:48:42+5:30
दुचाकीत तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने भररस्त्यात दिवसाढवळ्या दी बर्निंग बाईकचा थरार शेकडो तुमसरकरांना अनुभवास आला.

तुमसरात बर्निंग बाईकचा थरार
दुचाकीवरील कोंबड्यांचा होरपळून मृत्यू
तुमसर : दुचाकीत तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने भररस्त्यात दिवसाढवळ्या दी बर्निंग बाईकचा थरार शेकडो तुमसरकरांना अनुभवास आला. सकाळी ११.४५ च्या सुमारास नवीन बसस्थानक परिसरातील मुख्य रस्त्यावर ही घटना शनिवारी घडली. पाहता - पाहता दुचाकी आगीत स्वाहा झाली. दुचाकीवरील चार ते पाच कोंबड्यांचा होरपळून मृत्यू झाला.
येरली येथील पवन धुर्वे दुचाकीने तुमसर येथे निघाले. पोल्ट्री फार्मचे व्यवसायिक असलेले धुर्वे यांच्या दुचाकीवर चार ते पाच कोंबड्या होत्या. शहरातील नवीन बसस्थानक परिसरातील मुख्य रस्त्यावर दुचाकीतील प्लग स्पार्किंग झाल्याचा आवाज आला. त्यामुळे धुर्वे यांनी दुचाकी रस्त्यात थांबविली. प्लगमध्ये आग दिसताच त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, परंतु आग वाढली. पाहता पाहता दुचाकीने आगीने कवेत घेतले. दुचाकीवरील चार ते पाच कोंबड्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. भररस्त्यात दुचाकीला लागलेली आग पाहून शेकडो नागरिक जागीच थांबले. दुचाकीचा स्फोट तर होणार नाही अशी भीती यावेळी नागरिकांना वाटून धावपळ सुरु झाली. काहींनी पोलिसांना पाचारण केले. हा थरार सुमारे १५ ते २० मिनिटे सुरु होता. सुदैवाने दुचाकीस्वार पवन धुर्वे यांनी प्रसंगावधान ओळखून दुचाकी थांबविल्याने मोठा अनर्थ टळला. नेमकी आग कशी लागली हे कळू शकले नाही. प्लग स्पार्क झाला व क्षणात दुचाकीला आग लागली. प्लग स्पार्कमुळे सहसा आग लागत नाही. दुचाकीतून पेट्रोल गळती होण्याची शक्यता आहे. क्षणात आगीच्या ज्वाळा दिसल्या. आगीमुळे दुचाकीचे अक्षरश: कोळसा झाला होता. चारचाकीला आगीच्या घटना झाल्या आहेत. परंतु दुचाकीची ही पहिलीच घटना आहे. (तालुका प्रतिनिधी)