तुमसरात फॉरेन्सिकची चमू दाखल
By Admin | Updated: July 6, 2015 00:27 IST2015-07-06T00:27:15+5:302015-07-06T00:27:15+5:30
स्थानिक गांधी नगरात शनिवारी रात्रीच्या झालेला स्फोट हा गॅस सिलिंडरचा नसून स्फोटक पदार्थामुळे स्फोट होऊन...

तुमसरात फॉरेन्सिकची चमू दाखल
प्रकरण सिलिंडर स्फोटाचे : उच्चस्तरीय चौकशीची मागणी
तुमसर : स्थानिक गांधी नगरात शनिवारी रात्रीच्या झालेला स्फोट हा गॅस सिलिंडरचा नसून स्फोटक पदार्थामुळे स्फोट होऊन घराचे स्लॅब कोसळल्याचा आरोप मृतकाचे मुरारी तिथोडे यांचे जावई दिनेश देहाती यांनी केला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे. या घटनेच्या चौकशीसाठी नागपूरहून फॉरेन्सीकची चमु तुमसरात दाखल झाली आहे.
गांधी नगरातील रवींद्र नागपुरे यांच्या राहत्या घरात स्वयंपाक खोली शनिवारला रात्री अचानक स्फोट झाला. स्फोटात घराचे स्लॅब कोसळले. घराशेजारील राजेश उके, जितेंद्र नाईक, डोंगरे यांच्या घराच्या खिडक्यांची काचे फुटली. गॅस सिलिंडरच्या स्फोटानंतर कुठेही आग लागल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे हा स्फोट सिलेंडरचा नसून स्फोटक पदार्थाने झाल्याचा आरोपही त्यांनी केला. जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप झळके यांनी आज घटनास्थळी भेट दिली. फॉरेन्सिकच्या चमूला पाचारण केले. दरम्यान फॉरेन्सिक लॅबचे सहसंचालक जी.एम. रामटेके व त्यांची चमू तिथे दाखल झाली. भिंतीचा मलबा उचलण्याकरिता जेसीबीची मदत नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांनी केली. या स्फोटाची कारणे शोधण्याकरिता तपासकार्याला वेग आला आहे. (शहर प्रतिनिधी)