तुमसरात २०० किलो खवा पकडला
By Admin | Updated: November 5, 2015 00:35 IST2015-11-05T00:35:18+5:302015-11-05T00:35:18+5:30
तिरोडा येथून भंडारा येथे एस.टी.तून २०० किलो खवा घेऊन एक व्यावसायिक जात असल्याची माहिती अन्न व औषध विभागाच्या पथकाला मिळाली.

तुमसरात २०० किलो खवा पकडला
नमुने प्रयोगशाळेत पाठविले : अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची बसस्थानकावर तपासणी
तुमसर : तिरोडा येथून भंडारा येथे एस.टी.तून २०० किलो खवा घेऊन एक व्यावसायिक जात असल्याची माहिती अन्न व औषध विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानंतर या पथकाने तुमसर बसस्थानक त्या व्यावसायिकाची चौकशी करून खव्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविले. या परिसरात आंतरराज्यीय खाद्यपदार्थ विक्रीची टोळी सक्रिय असल्याची माहिती या पथकाने दिली.
अगनलाल फागोलाल लिल्हारे (५२) रा.पिपरीया ता.तिरोडा हे तिरोडा नागपूर बसमधून २०० किलो खवा घेऊन जात होते. तुमसर बसस्थानकावर बुधवारला सकाळी ८.३० च्या सुमारास भंडाऱ्याचे अन्न सुरक्षा अधिकारी विनोद धवड यांनी त्यांना गाठले. यावेळी धवड यांनी लिल्हारे यांची चौकशी करीत असताना विचारले असता त्यांनी हा खोवा भंडारा येथील हॉटेलमध्ये विक्री करतो, असे पथकाला सांगितले. अन्न सुरक्षा अधिकारी धवड यांनी या खव्याची तपासणी करून काही नमुने घेतले. हे नमुने तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.
तिरोडा तालुक्यात असून मध्य प्रदेश सीमेला लागून आहे. मागील अनेक दिवसांपासून तुमसर तालुक्यात मध्य प्रदेशातून खोवा येत आहे. आंतरराज्यीय खाद्य पदार्थाची विक्रीची परवानगी आहे का? हा मुख्य प्रश्न आहे. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी नमुने घेऊन व्यवसायिकाला परत पाठविण्या आले.
नियमानुसार व्यावसायिकाविरुद्ध तात्काळ कारवाई करता येत नसून प्रयोगशाळेच्या अहवालानंतर या खव्यात भेसळ असल्याचा अहवाल आल्यावरच कारवाई करता येईल, असे सांगण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)