तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार
By Admin | Updated: March 8, 2016 00:27 IST2016-03-08T00:27:28+5:302016-03-08T00:27:28+5:30
शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे. जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले.

तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार
चरण वाघमारे यांचे प्रतिपादन : भरती पूर्व मार्गदर्शन
तुमसर : शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे. जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले. शिक्षणाशिवाय मानवाची प्रगती होवू शकत नाही. स्वत:ची प्रगती केल्याशिवाय दुसऱ्याची प्रगती, समाजाची प्रगती, राष्ट्राची प्रगती होऊ शकत नाही. कोणत्याही क्षेत्रात युवकांनी उडी घेतली. शंभर टक्के त्या करिता परिश्रम केले तर, तुम्हीच तुमचे जीवनाचे शिल्पकार ठरणार आहात, असे प्रतिपादन आमदार चरण वाघमारे यांनी केले.
येथील पोलीस ठाणेच्या वतीने आयोजित पोलीस भरती पूर्व मार्गदर्शन शिबिर गभणे सभागृहात घेण्यात आले. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ब्रास सिटी करीअर अॅकेडमी भंडाराचे संचालक धर्मेंद्र बोरकर होते. प्रमुख अतिथी म्हणून निलेश शिंदे, श्रीकांत कुरंजेकर, चंदू कांबळे, नगरसेवक प्रमोद तितीरमारे, माजी नगरसेवक योगेश सिंगनजुडे, राहुल डोंगरे, पंचायत समिती सदस्य मुन्ना पुंडे उपस्थित होते.
धर्मेंद्र बोरकर म्हणाले, स्पर्धात्मक परीक्षेत यश संपादन करण्यासाठी ताज्या घडामोडी, बातम्या, वर्तमानपत्राचे वाचन, भाषा विषयाचे व्याकरण, ऐतिहासिक घटना, भौगोलिक सामान्य ज्ञान, दैनंदिनी नोंदी, युवक युवतींनी ठेवायला पाहिजे. आरोग्य सुदृढ असण्यासाठी नियमित व्यायाम केले पाहिजे. कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा असो, त्याकरिता स्वत:ची मानसिक तयारी बनविली पाहिजे. ध्येय निश्चित करूनच यशाचे उंच शिखर गाठता येते. त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा केली पाहिजे. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, असे समजून जीवनात खचून न जाता गरूडझेप घेतली पाहिजे, असे प्रतिपादन केले.
स्पर्धात्मक परीक्षेच्या संदर्भात अशा प्रकारचे शिबिराचे आयोजन पोलीस स्टेशन तुमसर यांनी केल्यामुळे तुमसरकरांनी या उपक्रमाची स्तुती केली.
संचालन व आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक किशोर गवई यांनी केले. कार्यक्रमा करिता पोलीस अधिकारीव कर्मचारीवृंद यांनी सहकार्य केले. मार्गदर्शन शिबिराला शेकडो युवक युवतींनी उपस्थिती दर्शवून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचा लाभ घेतला. (शहर प्रतिनिधी)