येरलीत फिरते पोलीस ठाणे उपक्रमाची ‘डाक्युमेंट्री’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 22:13 IST2018-04-01T22:13:22+5:302018-04-01T22:13:22+5:30
‘फिरते पोलीस ठाणे’ हा भंडारा जिल्ह्याचा उपक्रम राज्यात लोकप्रिय ठरत असून या उपक्रमाची दखल राज्य शासनाने घेतली. देश पातळीवर हा उपक्रम राबविण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

येरलीत फिरते पोलीस ठाणे उपक्रमाची ‘डाक्युमेंट्री’
मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : ‘फिरते पोलीस ठाणे’ हा भंडारा जिल्ह्याचा उपक्रम राज्यात लोकप्रिय ठरत असून या उपक्रमाची दखल राज्य शासनाने घेतली. देश पातळीवर हा उपक्रम राबविण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. प्रसिद्ध हिंदी चित्रपट निर्माते संजय लिला भन्साली व अन्य चित्रपट निर्मितीत महत्वपूर्व तांत्रिक कामे करणारे एक युनिट तुमसर येथील येरली गावात शनिवारी सायंकाळी आले होते. या तांत्रिक युनिटने फिरते पोलीस ठाणे उपक्रमाची डाक्युमेंट्री तयार केली.
पोलीस व सर्वसामान्य नागरिकांत समन्वय राहावा, भीती राहू नये, शांतता व सुव्यवस्था नागरिकांच्या मदतीने राहावी याकरिता ‘फिरते पोलीस ठाणे’ हा नाविण्यपूर्ण उपक्रम भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी प्रायोगिक तत्वावर सुरु केला होता.
या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद जिल्ह्यात मिळाला. या उपक्रमाची दखल राज्य शासनाने घेऊन संपूर्ण राज्यात फिरते पोलीस ठाणे सुरु केले. या उपक्रमाची दखल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली. आता हा उपक्रम देशपातळीवर राबविण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
मुंबई येथे राज्याच्या पोलीस महासंचालक यांनी लाईव्ह डाक्युमेंट्री तयार करण्याकरिता इनोव्हेशन फिल्मस अँड एंटरटेनमेंट, मुंबई यांना देण्यात आली.या कंपनीच्या तंत्रज्ञांनी संजय लिला भन्साली यांच्या बाजीराव मस्तानी व अब तक ५६, २६/११ या चित्रपटाकरिता ‘एडीटिंग’ची कामे केली होती.
येरली येथे तुमसर पोलीस ठाण्यातर्फे फिरते पोलीस ठाणे हा उपक्रम शनिवारी घेण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक कंकाळे, समाज प्रबोधनकार राहुल डोंगरे, सरपंच रविता पारधी, उपसरपंच मुरली भगत, माजी सरपंच मदन भगत, नंदू राहांगडालेसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
बाजीराव मस्तानी तथा संजय लिला भन्साली यांची डाक्युमेंट्री तयार करणारे तंत्रज्ञ आकाश कॅथे, अब तक ५६ व २१६/११ चित्रपटाचे एडिटींग करणारे सुयोग बांगर, धिरेंद्र सिंग, प्रज्ञा पाटील इत्यादींनी डाक्युमेंटरी तयार केली. यावेळी तुमसर पोलीस ठाण्यातील इतर अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘फिरते पोलीस ठाणे’ या उपक्रमाची दखल राज्य शासनाने घेतली असून सदर उपक्रमाची डाक्युमेंटरी तयार करण्याकरिता मुंबई येथून चित्रपट निर्माते संजय लिला भन्साली यांच्यासोबत काम करणारे तंत्रज्ञांनी येरली येथे डाक्युमेंटरी तयार केली.
-गजानन कंकाळे,
पोलीस निरीक्षक, तुमसर