ओलिताअभावी यंदा उन्हाळी धानपीक निम्म्यावर
By Admin | Updated: December 26, 2015 00:40 IST2015-12-26T00:40:48+5:302015-12-26T00:40:48+5:30
सततची नापीकी व निसर्गाचा लहरीपणा यामुळे यावर्षी ही शेतकरी खचला आहे. यावर्षीची शेतीची अवस्था व आलेले उत्पन्न बघता शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा होती

ओलिताअभावी यंदा उन्हाळी धानपीक निम्म्यावर
शेतकऱ्यांवर अस्मानी संकट : कर्ज फेडायचे तरी कसे
संजय साठवणे साकोली
सततची नापीकी व निसर्गाचा लहरीपणा यामुळे यावर्षी ही शेतकरी खचला आहे. यावर्षीची शेतीची अवस्था व आलेले उत्पन्न बघता शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा होती. मात्र अपेक्षाभंग झाला असून शेतकरी पुरता हतबल झाला आहे. ओलीताअभावी यावर्षीही उन्हाळी धानपिकेही निम्म्यावर आली आहे.
साकोली तालुक्यात रबी पिकाचे क्षेत्र २ हजार ९०३ हेक्टर एवढे असून यात गहू २८८ हेक्टर, हरभरा ५०० हेक्टर, लाख-लाखोरी ९८२, पोपट ६० हेक्टर, वाटाना २३ हेक्टर, उडीद १३९ हेक्टर, मुंग ४२ हेक्टर, मसूर २५ हेक्टर, जवस ६२० हेक्टर, मोहरी ४९ हेक्टर तर भाजीपाला १७५ हेक्टरला लावण्यात आला असून यावर्षीच्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकाचे मोठे नुकसान होत असून खरीपानंतर शेतकऱ्यांना काहीशी रब्बी पिकावरील आशा आता निराशेत बदलली आहे.
पंचायत समितीच्या कृषी विभागात चौकशी केली असता मागील वर्षी उन्हाळी धानपीक हे १ हजार २८० हेक्टरला होते. मात्र यावर्षी कृषी केंद्रावरील धान बियाणे, खते व औषधी विक्रीच्या तुलनेत ही लागवड अर्ध्यावर असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याला एकमेव कारण म्हणजे ओलीत यावर्षी पावसाळ्यात अत्यल्प पाऊस आल्याने तळे, बोडी, विहिरीत पाणीच नाही. त्यामुळे उन्हाळी धानपिक कसे हा प्रश्न शेतकऱ्यापुढे आहे.
सरसकट कर्जमाफी दया
यावर्षी पावसाअभावी व किडीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. नापीकीमुळे बँक, सोसायटी, खत व औषधांचे कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करुन कृषीपंपाचे विजबिल माफ करावे, अशी मागणी जि.प. सदस्य होमराज कापगते यांनी केली आहे.