‘पतंग’ने कापला संकेतच्या आयुष्याचा धागा
By Admin | Updated: January 25, 2016 00:38 IST2016-01-25T00:38:09+5:302016-01-25T00:38:09+5:30
पतंग उडविताना तोल जावून एका १७ वर्षीय युवकाचा दुमजली इमारतीवरून पडून मृत्यू झाला. ही घटना शहरातील शुक्रवारी वॉर्डात शनिवारी सायंकाळी घडली.

‘पतंग’ने कापला संकेतच्या आयुष्याचा धागा
शुक्रवारी वॉर्डातील घटना : दुमजली इमारतीवरून पडून मृत्यू
भंडारा : पतंग उडविताना तोल जावून एका १७ वर्षीय युवकाचा दुमजली इमारतीवरून पडून मृत्यू झाला. ही घटना शहरातील शुक्रवारी वॉर्डात शनिवारी सायंकाळी घडली.
संकेत जयप्रकाश गायधने (१७) असे मृतक युवकाचे नाव आहे. शुक्रवारी वॉर्डातील रवींद्रनाथ टागोर वसाहतीतील रहिवासी जयप्रकाश गायधने यांचा संकेत हा एकुलता मुलगा होता. त्याच्या मृत्यूने गायधने कुटुंबावर दु:खाचे डोंगर कोसळले आहे.
मकरसंक्रांत असल्याने मोठ्या प्रमाणात पतंग उडविली जाते. शहरातील लालबहादूर शास्त्री विद्यालयात इयत्ता अकरावीत शिकणारा संकेत हा शनिवारला पंतग उडविण्यासाठी दुमजली इमारतीवर चढला. उत्साहात त्याने पतंग उडविली. दरम्यान त्याने अनेकांच्या पतंगांसोबत पेच खेळून कापल्या. या उत्साहात तो पंतग उडवीत असताना त्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. मात्र, संकेतचा आनंद नियतिला मान्य नव्हता. पतंग उडविण्याच्या उत्साहात संकेतचा तोल जावून तो इमारतीवरून खाली कोसळला. यात त्याला गंभीर दुखापत झाली.
याची माहिती होताचा कुटुंबीय व परिसरातील नागरिकांनी त्याला तातडीने जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती अत्यवस्थ असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला नागपूरला हलविण्याचा सल्ला दिला. दरम्यान त्याला रग्णवाहिकेत ठेवत असतानाच संकेतची प्राणज्योत मालविली.
पतंग उडविण्याची हौस संकेतच्या जीवावर बेतल्याने कुटुंबीयांवर दु:खाचे डोंगर कोसळले. रविवारला संकेतवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थितांनीही अश्रुंना वाट मोकळी केली. (शहर प्रतिनिधी)