जखमी बिबट गडेगाव मुक्कामी
By Admin | Updated: November 22, 2014 22:55 IST2014-11-22T22:55:36+5:302014-11-22T22:55:36+5:30
गडेगाव डेपो येथे जेरबंद असलेल्या जखमी बिबट्याची सुटका होणार असल्याचे सुतोवाच अस्साले तरी ही शक्यता तूर्तास तरी दिसत नाही. या बिबट्याच्या डोक्यावर जखमा असून पायाची नखे गळून पडली आहेत.

जखमी बिबट गडेगाव मुक्कामी
उपचार सुरुच : सुरक्षेसाठी वन कर्मचाऱ्यांची दमछाक
भंडारा : गडेगाव डेपो येथे जेरबंद असलेल्या जखमी बिबट्याची सुटका होणार असल्याचे सुतोवाच अस्साले तरी ही शक्यता तूर्तास तरी दिसत नाही. या बिबट्याच्या डोक्यावर जखमा असून पायाची नखे गळून पडली आहेत. त्यामुळे उपचारासाठी या बिबट्याचा मुक्काम आणखी दोन महिने वाढणार असून सुरक्षेसाठी वन कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होणार आहे.
साकोली तालुक्यातील जांभळी (खांबा) येथील महिलेला ठार करणाऱ्या बिबट्याला वन विभागाने ५ नोव्हेंबर रोजी जेरबंद केले. त्यानंतर त्याला गडेगाव येथील वन विभागाच्या कार्यालयात आणण्यात आले. तेव्हापासून हा बिबट त्याचठिकाणी पिंजऱ्यात देखरेखीखाली आहे. परंतु, अनेक दिवसांपासून एकाच ठिकाणी जेरबंद असलेल्या या बिबट्याजवळ कुणी गेल्यास तो चवताळून पिंजऱ्यावर डोके आपटतो. हा प्रकार सातत्याने होत असल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. परंतु, त्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून औषधोपचार सुरूच आहे.
जेरबंद होण्यापूर्वीपासूनच बिबट्याच्या पायाला इजा झाल्यामुळे त्याची नखे गळून पडली होती. त्यामुळे त्याला जंगलात भक्ष्य मिळणे कठीण झाले होते. त्यामुळेच त्याने आपला मोर्चा गावांकडे वळविला होता. वन विभागाने बिबट्याला पकडल्यानंतर त्याच्या पायाची इजा लक्षात आली व औषधोपचार सुरू करण्यात आले. औषधोपचाराला तो प्रतिसाद देत असला तरी तो पूर्णपणे बरा होण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत त्याच्या सुरक्षेची मोठी जबाबदारी वन कर्मचाऱ्यांपुढे असून या बिबट्यामुळे कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.
सध्या बिबट्यासाठी वन विभागाने अधिकचे कर्मचारी नियुक्त केले आहेत. काही कर्मचारी साकोली तर काही भंडाऱ्यातील आहेत. या बिबट्याला अन्य ठिकाणी हलविण्यात येणार असले तरी पूर्णपणे बरा होईपर्यंत हलविणे शक्य नाही. (नगर प्रतिनिधी)