गरिबीला कंटाळून वृद्धाची आत्महत्या
By Admin | Updated: November 14, 2015 00:58 IST2015-11-14T00:58:21+5:302015-11-14T00:58:21+5:30
गरिबीला कंटाळून एका ६० वर्षीय वृद्धाने रेल्वेखाली स्वत:ला झोकून आत्महत्या केल्याची घटना आज (शुक्रवारला) ...

गरिबीला कंटाळून वृद्धाची आत्महत्या
वृद्ध मध्य प्रदेशातील : तिरोडी-तुमसर रेल्वे रूळावरील घटना
तुमसर : गरिबीला कंटाळून एका ६० वर्षीय वृद्धाने रेल्वेखाली स्वत:ला झोकून आत्महत्या केल्याची घटना आज (शुक्रवारला) सकाळी ९.१० वाजताच्या सुमारास स्थानिक तुमसर रेल्वे टाऊन मार्गावरील तिरोडीं-तुमसर रूळावर घडली.
रमेश सात्माराम मेश्राम (६०) वर्ष. रा. कटोरी ता. कटंगी (जि. बालाघाट) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. शुक्रवारला सकाळी ६ वाजताच्या सुमारास नागपुरला कामाकरिता जातो म्हणून रमेश हा कटोरी येथून निघाला होता. माहितीनुसार, रमेश मेश्राम यांच्या मुलीचे लग्नकार्य असल्याची माहिती आहे. मात्र हातात दमडीही नसल्याने कार्य करायची कसे या विंवचनेत ते होते. याच विवंचनेत ते तुमसर येथे आले. आत्महत्या करण्याच्या उद्देशाने तुमसर टाऊन येथे पोहचले. मेश्राम हे तुमसर टाऊन स्थानकापासून १०० मी अंतरावर रेल्वे रूळावर जावून झोपी गेले. याच कालावधीत तिरोडी-नागपूर रेल्वे गाडी आली. गाडीच्या चालकाला रेल्वे रूळावर काही तरी पडल्याचे दिसताच त्याने मोठ मोठ्याने हार्नही वाजविला. मात्र रमेश मेश्राम हे रेल्वे रूळावरून तसुभरही सरकले नाही.
परिणामी त्याच्यांवरून रेल्वेगाडी गेल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. घटनेपूर्वी त्यांनी मद्यप्राशन केले असावे, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला. घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना देण्यात आली. परंतू पोलिसांना घटनास्थळावर पोहचण्यास दोन तास उशिर झाल्याने त्याचमार्गाने तिरोडीकडे सकाळी १०.३० वाजता जाणारी रेल्वे गाडीही त्याच्या शवावरून जाताना परिसरातील नागरिकांनी बघीतल्याने चांगलाच थरकाप उडाला. मृतकाच्या खिशात मिळालेल्या ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली. या घटनेची माहिती त्यांच्या नातेवाईकाला माहिती देण्यात आली. (शहर प्रतिनिधी)