जलजन्य आजार नियंत्रणावर कार्यशाळा
By Admin | Updated: April 28, 2016 00:33 IST2016-04-28T00:33:09+5:302016-04-28T00:33:09+5:30
जागतिक हिवताप दिवस साजरा करण्याच्या निमित्ताने राष्ट्रीय किटकजन्य व जलजन्य आजार नियंत्रण व पाणी गुणवत्ता ....

जलजन्य आजार नियंत्रणावर कार्यशाळा
जागतिक हिवताप दिनाचे औचित्य : ४६ गावातील सरपंच, सचिवांची उपस्थिती
भंडारा : जागतिक हिवताप दिवस साजरा करण्याच्या निमित्ताने राष्ट्रीय किटकजन्य व जलजन्य आजार नियंत्रण व पाणी गुणवत्ता कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील ४६ अंतिसंवेदनशिल गावातील सरपंच व सचिव यांची कार्यशाळा जिल्हा परिषद सभागृह भंडारा येथे घेण्यात आली. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांचे अध्यक्षतेखाली व उप मुख्य कार्यकारी अधिकारी आडे तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डोईफोडे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर यांचे उपस्थितीत संपन्न झाली.
माहे जून २०१६ पासून जिल्ह्यात पावसाळा सुरू होत असल्याने किटकजन्य आजाराचे संभाव्य उद्रेक टाळण्यासाठी स्थानिक परिस्थितीनुसार गाव पातळीपर्यंत योग्य ते प्रतिबंध व नियंत्रणासाठी उपाययोजना सतर्कतेने राबविणे गरजेचे असून त्याची प्रभावी अंमलबजावणी ग्रामस्थाकडून करण्यासाठी सहकार्य व जनजागृती करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात मागील वर्षी २०१५ मध्ये जिल्ह्यात हिवताप डेंगू व इतर किटकजन्य आजार तसेच गॅस्ट्रो, अतिसार आदी जलजन्य आजाराची लागण झाल्यामुळे त्यांचे नियंत्रण करण्याकरिता सर्व जनतेने काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे, असे सांगितले. कार्यक्रमाला उपस्थित सरपंच व सचिवाकरिता जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयातर्फे प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये हिवताप डेंग्युला कारणीभूत अॅनाफिलीस व एड्स डास तसेच हत्तीरोगाकरिता क्युलेक्स व चंडीपुरा या आजाराकरीता सॅन्डप्लाय व डासांच्या अळ्या व डासांना भक्षण करणारे गप्पी मासे, किटकनाशक फवारणी व धुरळणी यंत्र आदी साधने ठेवण्यात आली होती. कार्यक्रमाचे आभार जिल्हा विस्तार अधिकारी मस्के यांनी केले. कार्यक्रमाला जि.प. आरोग्य विभाग, हिवताप, हत्तीरोग कार्यालय येथील सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. (शहर प्रतिनिधी)