घरकामाचा ताण वाढला, पण नात्याची वीण घट्ट होतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 06:50 PM2020-04-04T18:50:28+5:302020-04-04T18:52:41+5:30

लॉकडाऊनच्या काळात घरातील महिलांवर कामाचा अतिरिक्त ताण येत असताना त्यांची दिनचर्या नेमकी कशी आहे याचा शोध घेण्याचा लोकमतने प्रयत्न केला.

Workload increased, but the relations became strong | घरकामाचा ताण वाढला, पण नात्याची वीण घट्ट होतेय

घरकामाचा ताण वाढला, पण नात्याची वीण घट्ट होतेय

googlenewsNext
ठळक मुद्देभंडारातील महिलांशी संवाद अनेकींचा दुपारचा निवांतपणा स्वयंपाकगृहात

ज्ञानेश्वर मुंदे
लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : लॉकडाऊनने घराबाहेर निघता येत नाही, सर्वच घरी असल्याने कामांचा ताण वाढला. दुपारचा निवांतपणा हरवून स्वयंपाकगृहात अधिक काळ द्यावा लागतो. भांडी धुणीही स्वत:च करावी लागते. हे सर्व खरे असले तरी लॉकडाऊनने नात्याची वीण घट्ट केली, असे भंडारा शहरातील महिलांनी सांगितले. लॉकडाऊनच्या काळात घरातील महिलांवर कामाचा अतिरिक्त ताण येत असताना त्यांची दिनचर्या नेमकी कशी आहे याचा शोध घेण्याचा लोकमतने प्रयत्न केला.
लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या शिक्षिका स्मिता गालफाडे म्हणाल्या, लॉकडाऊनमुळे आम्ही सर्व घरातच आहोत. पूर्वी नोकरीमुळे घरातील अनेक गोष्टी करता येत नव्हत्या. आता या निवांत वेळेत ते करते. सर्व पदार्थ आनंदाने करून सर्वांना खाऊ घालते. भांडे आणि कपडे धुण्याचा कंटाळवाणा कार्यक्रमाचा गझल गात मनमुराद आनंद घेते. शिक्षिका असल्याने दुपारचा निवांतपणा आमच्या नशिबी नव्हता. परंतु आता थोड्या काळासाठी का होईना तो आला. सर्वांनी घरातच राहून कोरोनाशी सुरु असलेली लढाई जिंकायची आहे, असे गालफाडे यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्त्या वर्षा गौपाले म्हणाल्या मस्त आरामात दिवस जातो आहे. उशिरा उठणे, दैनंदिन कार्यक्रम आटोपणे असा दिनक्रम असतो. मुलगी सध्या घरी आली आहे. तिला स्वयंपाक शिकवित आहे. रोज नवीन नवीन पदार्थ तिला शिकवून त्याचा आस्वाद आम्ही सर्व कुटुंबिय आम्ही घेत आहे. दुपारच्या काळात भिलेवाडा येथे सुरु होणाऱ्या एका प्रकल्पाचे नियोजन करीत आहे, असे त्यांनी सांगितले.
गृहिणी अन्नपूर्णा वंजारी यांनी आपले अनुभव कथन करताना सांगितले, सध्या सर्व मुले घरी आहेत. आमचा मुलगा नयन हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करतो. तो आता घरी आहे. रोज नवनवीन पदार्थ तयार करतो. आम्हालाही तो शिकवतो. सर्व कुटुंब घरीच असल्याने मोबाईलमुळे पूर्वी न होणारा संवाद आता वाढला आहे. नगरसेवक असलेले पती मंगेश वंजारी यांनी विस्थापित मजुरांना सुरुवातीच्या काळात भोजनाची व्यवस्था केली होती. त्या सर्वांचे भोजन घरीच तयार करीत होती. संकटाच्या काळात कुणाच्या मदतीला धावून जाता आले याचा आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले. सीमा नंदनवार म्हणाल्या, मुलांच्या आवडी-निवडी पुरविताना हातघाईस येत आहे. मुलांचे लाड पुरविणे, आवडीचे पदार्थ खाऊ घालणे यात सर्व दिवस जातो. भांडी धुणी करणे म्हणजे मोठी कसरत असते. दुपारचा निवांतपणाही या लॉकडाऊनने हिरावला असे सांगितले. स्नेहा घाटबांधे म्हणाल्या, आम्ही तसे घरीच असतो. परंतु बाहेर फिरायला जायची आवड आहे. या काळात घरातून बाहेरच निघता येत नाही याचे दु:ख आहे. आमच्या छोट्या बाळाची काळजी घेते. घरातील वृद्धांचीही काळजी घेत घरातील सर्व कामे करते.
अशा एक ना अनेक महिलांनी लॉकडाऊनच्या काळातील आपले अनुभव व्यक्त केले. नात्याची वीण घट्ट करणारा हा काळ भविष्याचे नियोजन आणि यातून बरेच काही शिकण्यासारखे असल्याचे सांगितले. घरात राहून कंटाळा येत असला तरी त्याला आता इलाज नाही. कोरोनाची लढाई जिंकायचीच असा अनेक महिलांनी निर्धार केला.

पती ड्युटीवर, मनात हुरहूर
भंडारा येथील गृहिणी श्रद्धा डोंगरे यांचे पती पोलीस खात्यात आहेत. तुमसर येथे सध्या त्यांची ड्युटी आहे. सायंकाळी घरी येईपर्यंत मनात सारखी हुरहूर असते. अनेकदा आम्ही त्यांना फोन करून मास्क बांधला काय, सॅनिटाईझरने स्वच्छ केले काय याची आठवण देत असतो. सर्वांचे पप्पा घरी आहेत. आपलेच पप्पा का नाही असे मुले सारखे विचारत असतात. त्यांना समजवून सांगतात नाकी नऊ येते. कामाचा ताण असला तरी मनात कायम हूरहूर असते. हेही दिवस जातील असे त्या सांगत होत्या. 

Web Title: Workload increased, but the relations became strong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.