‘वर्क आॅर्डर’विना केली कामे!
By Admin | Updated: August 5, 2016 00:45 IST2016-08-05T00:45:19+5:302016-08-05T00:45:19+5:30
जिल्हा परिषदेचा लघु पाटबंधारे विभाग ऐनकेन प्रकारे सध्या चर्चेत आहेत. यात आणखी एका प्रकाराने भर घातली आहे

‘वर्क आॅर्डर’विना केली कामे!
भंडारा : जिल्हा परिषदेचा लघु पाटबंधारे विभाग ऐनकेन प्रकारे सध्या चर्चेत आहेत. यात आणखी एका प्रकाराने भर घातली आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी होऊ घातलेल्या जलयुक्त शिवारांतर्गत कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम ‘वर्क आॅर्डरविना’ केल्याची खमंग चर्चा आहे. यात तुमसर तालुक्यातील दोन कोल्हापुरी बंधाऱ्यांचा समावेश आहे. या बांधकामातून सबंधितांनी चांगलाच मलिदा लाटल्याची चर्चा खुद्द पाटबंधारे विभागात आहे. यादरम्यान जलसंधारणाची बैठक होत असल्याने विविध मुद्दे गाजण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे तुमसर, मोहाडी व लाखांदुर येथे लघुपाटबंधारे विभागाचा उपविभाग करण्याचा निर्णय हा २० मार्च २०१० मंजुर करण्यात आला. मात्र, याची प्रशासनात्मक कारवाई न झाल्याने कार्यालय सुरूच झाले नाही. परिणामी आजही सर्व कारभार भंडारा येथून चालतो. तुमसर, मोहाडीतील अभियंते सुटीवर गेल्याने नवीन अभियत्यांना प्रभारही देण्यात आलेला नसल्याची माहिती आहे. परिणामीे तलावांची देखभाल व दुरूस्ती होत नसल्याची माहिती आहे. यादरम्यान जलयुक्त शिवारांतर्गत कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम वर्क आॅर्डर न देता केल्याची चर्चा आहे. याची चौकशी होणार तर नाही? या विवंचनेत सबंधित अधिकारीवर्ग प्रकरणावर कुणीच बोलायला तयार नाही. (प्रतिनिधी)