उड्डान पुलाचे काम ठरतेय नागरिकांसाठी जीवघेणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:35 IST2021-03-31T04:35:46+5:302021-03-31T04:35:46+5:30

लाखनीः राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील लाखनी व मुरमाडी (सावरी) येथून जाणाऱ्या मार्गावर जेएमसी कंपनीद्वारे उड्डाण पुलाचे काम गेल्या ...

The work of the flyover is to take the lives of the citizens | उड्डान पुलाचे काम ठरतेय नागरिकांसाठी जीवघेणे

उड्डान पुलाचे काम ठरतेय नागरिकांसाठी जीवघेणे

लाखनीः

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील लाखनी व मुरमाडी (सावरी) येथून जाणाऱ्या मार्गावर जेएमसी कंपनीद्वारे उड्डाण पुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. महामार्गाच्या मध्यभागी पिलर उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे; मात्र त्या पिल्लरला जोडण्याचे काम मोठ्या गतीने सुरू आहे. सतत वाहतूक सुरू असते, तसेच रस्त्यावर उड्डाण पुलाचे काम सुरू असल्याने अवजड वाहनांची वाहतूक सर्व्हिस रोडवरून सुरू असते.

येथील बाजार समितीच्या याॅर्डापासून ते केसलवाडा फाट्यापर्यंतच्या बन्सी डेअरीपर्यंत उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. दोन्ही टोकाची स्कोप तयार करण्यात येत आहेत, तसेच लाखनी व मुरमाडीच्या क्षेत्रात येणाऱ्या नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू आहे. कंपनीने काम जोमाने सुरू केले; परंतु लोकांच्या सुरक्षिततेची व्यवस्था केली नसल्याने अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अवजड वाहनांची वाहतूक सर्व्हिस रोडवरून होत असल्यामुळे सर्व्हिस रोड पूर्णपणे उखडला आहे. लाखणीवासीयांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन या मार्गाने आवागमन करावे लागत आहे.

केसलवाडा फाट्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे दिलीराम वाघाये यांना आपला जीव गमवावा लागला. लाखणी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार, भरधाव वेगाने धडक देणाऱ्या ट्रेलरच्या चालकाला दोषी मानले जात आहे, तसेच जेएमसी कंपनीच्या मॅनेजरला दोषी मानले आहे. अपघातानंतर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले आहेत. रस्ता वाहतुकीस योग्य असता, तर हा अपघात घडला नसता. रहदारीच्या कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत, तसेच वाहतूक रक्षकांच्या अभावामुळे अपघाताच्या घटनांचे प्रसंग सारखे निर्माण होत आहेत.

बॉक्स

ट्राफिक मार्शल्सची कमतरता

शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी जेएमसी कंपनीने मुरमाडी चौक, तहसील चौक, बाजार चौक, जयस्तंभ चौक, लाखोरी रोड चौक, मुख्य बसस्थानक येथे ट्राफिक मार्शल्स नेमणूक केली आहे; मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता बहुसंख्य ट्राफिक मार्शल्स कामावरून कमी केले आहे. त्यापैकी अनेक कामगार स्थानिक होते. ट्राफिक मार्शल्सची संख्या मोजकी आहे. प्रत्येक चौकात दोन्ही बाजूला वाहतूक कर्मचारी ठेवणे आवश्यक आहे; परंतु एका चौकात एकच वाहतूक कर्मचारी आहे.

बॉक्सबॉक्स

उड्डाणपुलावर सुरक्षेचा अभाव

ज्या ठिकाणी काम सुरू आहे, त्या ठिकाणी सुरक्षिततेचा अभाव आहे. कामाची पूर्वसूचना असणारे फलक लावलेले नसतात. केसलवाडा (फाटा) व पोलीस स्टेशनसमोरील परिसरात जेथून उड्डाणपूल सुरू होतो व संपतो त्या ठिकाणी सुरक्षिततेची पुरेपूर अंमलबजावणी केलेली नाही.

बॉक्सबॉक्स

सर्व्हिस रोडवर विक्रेत्यांचे अतिक्रमण

सर्विस रोडवरून वाहतूक सुरू असते. लाखनी व मुरमाडी हद्दीत येणाऱ्या मार्गावर फळवाले, भाजीपाला, कपडे, चप्पल, जनरल सामानाची दुकाने रस्त्यावर लावलेली आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडचणी निर्माण होतात, वेळोवेळी वाहतुकीचा खोळंबा होत आहे. याकडे पोलीस विभाग व नगरपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

Web Title: The work of the flyover is to take the lives of the citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.