मुख्याध्यापक करताहेत कारकुनाची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2016 02:01 IST2016-06-13T02:01:41+5:302016-06-13T02:01:41+5:30
जिल्ह्यातील खासगी शाळांमध्ये चार वर्षांपासून लिपिकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे रिक्त पदे असलेल्या खासगी शाळांमधील

मुख्याध्यापक करताहेत कारकुनाची कामे
मोहाडी : जिल्ह्यातील खासगी शाळांमध्ये चार वर्षांपासून लिपिकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे रिक्त पदे असलेल्या खासगी शाळांमधील मुख्याध्यापकांना कारकुनाची सर्व कामे करावी लागत आहेत.
महाराष्ट्र शासनाने शिक्षक व लिपिकांची पदे भरण्यावर बंदी आणली आहे. तथापि शिक्षक भरतीवर काही अंशी बंदी उठविण्यात आली असली तरी शिक्षकांची पदे भरता येत नाही.
शिक्षक मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त ठरत आहेत. त्यांचा समायोजनाचा प्रश्न सुटेपर्यंत शिक्षक भरती प्रक्रिया सध्यातरी पुर्णपणे बंद आहे. मात्र दुसरीकडे चतुर्थश्रेणी कर्मचारी लिपिक व शिपाई यांची पदे मागील चार वर्षांपासून रिक्त पडलेली आहेत.
भंडारा जिल्ह्यात लिपीक / शिपाई कोणत्याच शाळांमध्ये अतिरिक्त नाही. उलट २७ खासगी शाळेत लिपिकाची व एका खासगी शाळेत शिपायाचे पद रिक्त पडलेले आहेत.
मात्र शासनाने लिपीक, शिपाई पदे भरण्यासाठी काहीएक पावले उचलली नाही. मागील महिन्यात शिक्षक संचालकांनी लिपीक / शिपाई रिक्त पदाची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांना मागविली होती, हे येथे उल्लेखनीय.
जिल्हा परिषद शिक्षण विभाग (माध्य.) भंडारा यांनी शिक्षण संचालकांना लिपिक / शिपाई रिक्त पदांची माहिती दिली आहे. शासन स्तरावर अजून काही निर्णय झाला नसल्याचे समजते.
खासगी शाळांमध्ये लिपिक संवर्गाची रिक्त पदे असल्याने लिपिकाच्या कामाचा भार मुख्याध्यापकांवर येवून पडला आहे. मुख्याध्यापकांवर आधीच कामाचा बोजा अधिक आहे.
तो बोजा सांभाळीत असताना लिपिकाची सर्व कामे त्यानांच पार पाडावी लागतात. शाळेचे प्रशासननिक कामे अद्यायवत ठेवणे, अध्यापन करणे, हेही कामे लागलीच आहेत. त्यामुळे मुख्याध्यापकांना मानसिक ताणातून जावे लागत आहे.
लिपीक / शिपाई पदाची रिक्त पदे शासनाने भरावीत अशी मागणी विदर्भ शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विजय भुरे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)