ज्योतीताई ठाकरे : भंडारा तेजस्विनींचा प्रवास माहितीपटाचे उद्घाटन
भंडारा: कोरोना काळात स्थलांतरितासह रुग्णांच्या खाण्यापिण्याची केलेली उत्तम व्यवस्था तसेच कोरोना काळात एकत्र न येताही डिजिटलच्या माध्यमातून ऑनलाइनही काम कसे उत्कृष्ट करता येईल याचा चांगला आदर्श भंडारा माविमच्या टीमने संपूर्ण राज्यासमोर ठेवला आहे. त्यामुळे आता राज्यातील इतर जिल्ह्यातील माविमकडूनही कामाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. भंडारा जिल्ह्यातील तेजस्विनींच्या प्रवासाचा माहितीपट पाहिल्यानंतर राज्यातील इतर महिलांना नक्कीच प्रेरणा मिळेल, हा माहितीपट राज्यासाठी दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योतीताई ठाकरे यांनी केले.
माविम मुख्यालयात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकी दरम्यान महिला आर्थिक विकास महामंडळ भंडारा कार्यालयाच्या वतीने आयोजित भंडारा तेजस्विनीचा प्रवास माहितीपट ऑनलाइन उद्घाटन समारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डेव्हलपमेंट बोर्डाचे डेप्युटी डायरेक्टर विकास कुलकर्णी, राज्यपालांचे प्रतिनिधी म्हणून लता मेहता, माविमच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी (शर्मा ), प्रकल्प महाव्यवस्थापक कुसुम बाळसराफ, वित्त व प्रशासन प्रकल्प महाव्यवस्थापक राजहंस कुंटे, मृणालिनी भूत, सहा. जिल्हा नियोजन अधिकारी वसुंधरा फाळके, माविंमचे जिल्हा सम्वयक प्रदीप काठोळे, विभागीय संनियंत्रण अधिकारी राजू इंगळे, सहा. जिल्हा समन्वय अधिकारी विष्णू झाडे, लेखाधिकारी मुकुंद देशकर, भावना डोंगरे सहाय्यक, राकेश कुरजेकर सहाय्यक, चेतना टेकाम उपस्थित होते.
ज्योतीताई ठाकरे यांनी भंडारा माविमच्या टीमने कोरोना कालखंडात केलेल्या कार्याचे कौतुक केले. तसेच यापुढेही अशाच कामाची अपेक्षा व्यक्त केली. संचालक श्रद्धा जोशी यांनी भंडारा जिल्ह्याने एक अनोखा पॅटर्न राबवून कोरोनातही संकटावर कशी मात करता येते व कसा मार्ग काढता येतो, याचा वस्तुपाठ रुजवला असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी भंडारा माविंम टीमचे कौतुक केले. सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी वसुंधरा फाळके यांनी माविंमतर्फे राबविलेल्या बारदाना निर्मिती, कोशनिर्मिती, कांडपयंत्र तसेच ई रिक्षा प्रकल्प हे महिलांसाठी रोजगाराचे खूप मोठे साधन बनले असल्याचे सांगितले.
जिल्हा समन्वयक प्रदीप काठोळे यांनी प्रास्ताविकातून जिल्ह्यातील पूर्वीची बचत गटांची स्थिती, उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्ती व त्याला पूरक व्यवसायनिर्मितीसाठी गरजू महिला तसेच बचत गटांची चाचपणी करून निवड केल्यानेच आज अनेक महिलांची कुटुंबे सक्षम बनली असल्याचे सांगितले. प्रास्ताविक जिल्हा समन्वयक प्रदीप कठोळे यांनी तर आभार विभागीय मूल्यमापन अधिकारी राजू इंगळे यांनी मानले. ऑनलाइन तेजस्विनी प्रवास माहितीपटासाठी माविंम संचलित व प्रभात लोकसंचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापक रंजना खोब्रागडे, क्षेत्रीय समन्वयक मनोज केवट, लेखपाल रोशन साकोरे, सहयोगिनी अरुणा बांते, शोभा अंबुने यांच्यासह अन्य सीआरपी महिला सहभागी झाल्या होत्या.