महालगाव येथील बंधाऱ्याचे काम निकृष्ट
By Admin | Updated: June 12, 2017 00:31 IST2017-06-12T00:31:27+5:302017-06-12T00:31:27+5:30
महालगाव - मोरगाव येथील गायमुख नाल्यावर जलयुक्त शिवार योजनेतून बंधारा बांधण्यात येत आहे.

महालगाव येथील बंधाऱ्याचे काम निकृष्ट
पुरातच वाहून जाण्याची शक्यता : गावकऱ्यांतर्फे जनआंदोलनाचा इशारा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : महालगाव - मोरगाव येथील गायमुख नाल्यावर जलयुक्त शिवार योजनेतून बंधारा बांधण्यात येत आहे. या बंधाऱ्याच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून तसेच प्रमाणापेक्षा कमी साहित्य वापरण्यात येत आहे. त्यामुळे बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे.
हा बंधारा एक दोन पुरातच वाहून जाण्याची शक्यता असून त्यामुळे जीवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बंधाऱ्याच्या बांधकामाची चौकशी करावी, अशी मागणी सुधाकर बुरडे, सुनिल मेश्राम आदींनी केली आहे.
महालगाव मोरगाव जवळील नाल्यावर जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने दोन बंधाऱ्यांचे काम जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत मंजूर झाले आहेत. या बंधाऱ्याचे बांधकाम सुशिक्षित बेरोजगार अभियंता चुटे यांना देण्यात आला आहे. मात्र त्यांनी हे काम स्वत: न करता अवैधरित्या पेटीकॉन्ट्रॅक्टर सुधाकर गायधने यांना दिले आहे. बंधाऱ्याचे बांधकाम पेटीकॉन्ट्रॅक्टर करीत आहे. बंधाऱ्याच्या बांधकामात अल्प प्रमाणात लोहा, सिमेंट वापरण्यात येत असून काँक्रीटमध्ये मोठमोठे दगड, मातीमिश्रीत रेती तसेच नाल्यातील गढूळ मातीमिश्रीत पाणी तसेच रेती वापरण्यात येत आहे.
अंदाजपत्रकाप्रमाणे बांधकाम न करता कंत्राटदार आपल्या मनमर्जीने हा पेटी कॉन्ट्रॅक्टर काम करीत आहे. शाखा अभियंत्याला हाताशी धरून हा सर्व खेळखंडोबा सुरु आहे. ज्या उद्देशाने व शेतकऱ्यांच्या भल्यासाठी बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात येत आहे. या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याने बांधकाम त्वरीत थांबवून झालेल्या कामाची तपासणी करावी. तसेच उत्कृष्ट व टिकाऊ बंधारा तयार करण्यात यावा अन्यथा गावकऱ्यांतर्फे जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा सुधाकर बुरडे, सुनिल मेश्राम यांनी निवेदनातून दिला आहे. लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, मोहाडीचे तहसीलदार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, जिल्हाधिकारी यांना या बाबत निवेदन दिले आहे.