तुमसरचे वन कार्यालय की लाकडांचा डेपो?
By Admin | Updated: May 1, 2015 00:45 IST2015-05-01T00:45:21+5:302015-05-01T00:45:21+5:30
तुमसर वनपरिक्षेत्र कार्यालयात कारवाई केलेल्या लाकडांचा मोठा साठा जमा झाला आहे.

तुमसरचे वन कार्यालय की लाकडांचा डेपो?
तुमसर : तुमसर वनपरिक्षेत्र कार्यालयात कारवाई केलेल्या लाकडांचा मोठा साठा जमा झाला आहे. यामुळे कार्यालयाऐवजी त्याला वन डेपोचे रुप आले आहे.
तुमसर वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांच्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावून लाकडाचा विविध ठिकाणाहून साठा जप्त केला. ती लाकडे तुमसर येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या आवारात जमा केली आहेत. मोठा साठा येथे जमा झाल्याने त्याला वनडेपोचे स्वरुप आले आहे.
या वनपरिक्षेत्राच्या सीमा लांब आहेत. तुमसर ते किसनपूर, चिचोली, बपेरापर्यंत वनपरिक्षेत्र विस्तारले आहे. जंगल घनदाट असून राखीव व संरक्षित जंगलाचा त्यात समावेश आहे. कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी आपली कामगिरी चोख बजावून लाकडाचा साठा जप्त केला. परंतु कागदी कारवाई करण्यात दप्तरदिरंगाई दिसून येत आहे. रामेश्वर मोटघरे यांच्या लाकडाच्या दोन पीकअप गाड्या चार महिन्यापूर्वी पकडून जप्त करण्यात आल्या. त्यातील लाकूड पीक गाड्यात जसाचा तसाच आहे. कागदी कारवाई, चौकशी पूर्ण झाली. परंतु त्या चारचाकी गाड्या अजूनही तशाच उभ्या आहेत. कार्यालयाकडून दप्तरदिरंगाई करण्यामागचे कारण अद्याप कळले नाही. आवारात जुनी लाकडे मागील कित्येक महिन्यापासून पडून आहेत. ती डेपोत जमा करण्यात आली नाही.
मुख्य कार्यालयात भंडाऱ्याचे उपवनसंरक्षासह वरिष्ठ अधिकारी भेटी देतात. परंतु त्यांच्याकडूनही साधी विचारपूस केली गेली नाही. दप्तरदिरंगाई होते की केली जाते हे अद्याप गुलदस्त्यात आहे. (तालुका प्रतिनिधी)