शेप महाबचत गटाविरूद्ध महिलांचा आक्रोश
By Admin | Updated: October 25, 2016 00:22 IST2016-10-25T00:22:21+5:302016-10-25T00:22:21+5:30
बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे संघटन करून बकरीपालन व कुक्कुटपालनाचा व्यवसाय केला.

शेप महाबचत गटाविरूद्ध महिलांचा आक्रोश
मोरेश्वर मेश्राम एलसीबीत हजर : दिवसभर घडल्या नाट्यमय घडामोडी
भंडारा : बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे संघटन करून बकरीपालन व कुक्कुटपालनाचा व्यवसाय केला. यानंतर कोट्यवधी रूपयांचा गैरव्यवहार आजतागायत भूमिगत झालेला मोरेश्वर मेश्राम आज स्थानिक गुन्हे शाखेत हजर झाले. ही माहिती मिळताच शेकडो महिलांनी एलसीबीत धाव घेवून आक्रोश व्यक्त केला. दरम्यान आज या प्रकरणावरून दिवसभर नाट्यमय घडामोडी घडल्या.
महिलांना स्वयंरोजगार मिळवून देण्याच्या नावावर मोरेश्वर मेश्राम यांनी महिला बचत गटांची निर्मिती करण्याची प्रेरणा दिली. हळूहळू या बचत गटांच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल सुरू झाली. दिवसागणिक त्याचे जाळे जिल्हाभर पसरले. हजारोंची लाखोत तर लाखोंची कोट्यवधीत उलाढाल करण्याच्या दृष्टीने मेश्रमा यांनी बकरी व कुक्कुटपालनाचा व्यवसाय महिलांना सांगितला. या माध्यमातून अल्पावधीतच आर्थिक उन्नती होण्याचे प्रलोभनही महिलांना देण्यात आले. मेश्राम यांच्या भुलथापांना बळी पडलेल्या महिलांनी या व्यवसायासाठी आर्थिक गुंतवणुकही केली व सोबतच परिसरातील नागरिकांकडूनही पैसे गोळा करून ते मेश्राम यांच्या स्वाधीन केले. हा व्यवसाय त्यांनी भंडारा जिल्ह्यासह गडचिरोली, चंद्रपूर व लगतच्या जिल्ह्यातही पसरविला.
कालांतराने यात मोठा आर्थिक गैरव्यवहार करून मेश्राम यांनी बचत गटातील महिलांना 'तो मी नव्हेच' असे सांगून भंडारा येथून पसार झाला. घामाचा पैसा मेश्राम यांच्या स्वाधीन केल्याने व त्याची परतफेड न झाल्याने जिल्ह्यात महिलांमध्ये जनाक्रोश भडकला आहे. मागील अनेक दिवसांपासून मेश्राम यांच्या विरोधात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत. मात्र पोलिसांना त्याला ताब्यात घेण्यात यश आले नाही. मागील अनेक दिवसांपासून पसार असलेला मेश्राम आज स्थानिक गुन्हे शाखेत न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन घेवून पोहचला. याची माहिती महिलांना मिळाली. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेत महिलांची तोबा गर्दी उसळली.
यावेळी संतप्त महिलांनी स्थानिक गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक प्रशांत कोलवाडकर यांच्या कक्षात बसलेल्या मोरेश्वर मेश्राम यांच्यावर शिव्यांची लाखोळी वाहिली. अनेकांनी संताप व्यक्त करून मेश्राम यांना मारण्याच्या धमक्या देत त्याला बाहेर काढण्याचीही विनवनी पोलिसांना केली. वाढत चाललेली गर्दी व आक्रोश बघता तिथे पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला. दरम्यान उपस्थित नागरिकांनी त्याच्यावर आगपाखड करताना कोट्यवधींचा गैरव्यवहार करून कागदपत्रे दडवून ठेवण्याचा आरोपही लावला. यावेळी काही महत्वाची कागदपत्रे लपवून ठेवलेल्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी तपासणी केली. मात्र यात काय सापडले याबाबत वृत्त लिहेपर्यंत माहिती मिळू शकली नाही. (शहर प्रतिनिधी)