अवैध व्यावसायिकांविरुद्ध महिलांचा एल्गार
By Admin | Updated: March 8, 2016 00:23 IST2016-03-08T00:23:38+5:302016-03-08T00:23:38+5:30
दारूबंदी व रेती तस्करांविरोधात ११ महिला बचतगट तथा ग्रामस्थांनी एल्गार पुकारला आहे.

अवैध व्यावसायिकांविरुद्ध महिलांचा एल्गार
चांदमारा येथील घटना : दारु व रेती तस्कराविरोधात पोलिसात तक्रार, एकाला मारहाण
तुमसर : दारूबंदी व रेती तस्करांविरोधात ११ महिला बचतगट तथा ग्रामस्थांनी एल्गार पुकारला आहे. असामाजिक तत्वांकडून एका इसमाला जबर मारहाण केली असून त्याच्यावर भंडारा येथे उपचार सुरु आहेत. या प्रकरणाची लेखी तक्रार गोबरवाही पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. पोलिसांकडून ठोस कारवाई न झाल्याने आदिवासीबहुल चांदमारा या गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सातपुडा पर्वतरांगात चांदमारा हे ६०० लोकवस्तीचे गाव आहे. तालुका मुख्यालयापासून ३२ कि.मी. अंतर असून चांदमारा गणेशपूर व पौनारखारी गट ग्रामपंचायत आहे. येथे ११ महिला बचत गट आहेत. या महिला बचत गटातील महिला व ग्रामस्थांनी दारुबंदी व अवैध रेती तस्काराविरोधात एल्गार पुकारला आहे. गावात शांतता व गावाचे आरोग्य सुव्यवस्थित राहावे याकरिता दारुबंदी करण्याचा निर्धार केला. यामुळे गाव व परिसरातील अवैध व्यावसायिकांमध्ये शाब्दीक वाद झाला. त्यानंतर वाद विकोपाला गेला.
काही असामाजिक तत्त्वांनी गुदाम उईके (३५) याला जबर मारहाण केली. त्यात उईके गंभीररीत्या जखमी झाले. त्यांच्यावर भंडारा येथे उपचार सुरु आहे. या घटनेची तक्रार महिला मंडळाने दि. ५ मार्च रोजी गोबरवाही पोलीस ठाण्यात नोंदविली. परंतु पोलिसांनी ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे महिला व सामाजिक कार्यकर्त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. आदिवासीबहुल गाव असल्याने येथे दारुचा अवैध व्यवसाय तेजीत आहे. गावाजवळ लोभी हा रेती घाट व बावनथडीचे नदी पात्र आहे.
या नदीपात्रातून अवैध रेतीचा उपसा सर्रास सुरु असल्याचा विरोध महिला बचत गटातील महिलांनी केला. त्यामुळे त्यांचाही विरोधाचा सामना या महिला व ग्रामस्थांना करावा लागत आहे. तालुका मुख्यालयापासून गाव दूर असल्याने असामाजिक तत्वांचे येथे फावत आहे. पोलीस व महसूल प्रशासनाने येथे कारवाई करण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)
महिला बचत गटाच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध भादंवि ५०९ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. नियमानुसार दोषीविरुद्ध कारवाई करण्यात येईल.
- मनोज वाढीवे, सहायक पोलीस निरीक्षक गोबरवाही.