महिला, युवकांनी समाजासाठी झटावे!
By Admin | Updated: September 1, 2016 00:51 IST2016-09-01T00:51:09+5:302016-09-01T00:51:09+5:30
समाजातील अंधश्रद्धेला दूर ठेवून महिला व युवकांनी समाज हितासाठी एकत्र येऊन झटले पाहिजे.

महिला, युवकांनी समाजासाठी झटावे!
हिंगणकर यांचे प्रतिपादन : कार्यकारिणी व तेली समाज कार्यकर्त्यांची सभा
भंडारा : समाजातील अंधश्रद्धेला दूर ठेवून महिला व युवकांनी समाज हितासाठी एकत्र येऊन झटले पाहिजे. तसेच युवक व महिलांनी आपली शक्ती दाखविली पाहिजे. समाजबांधवांनी समाजहिताचे आव्हान स्वीकारले पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय तेली समाज महासभेचे कोषाध्यक्ष कृष्णराव हिंगणकर यांनी केले.
महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा भंडाराची कार्यकारिणी व जिल्ह्यातील समाज कार्यकर्त्यांची सभा राजीव गांधी चौकातील सेवनहिल लॉन्स येथे पार पडली. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय तेली (शाहू) समाज लखनऊचे रामलाल गुप्ता तसेच प्रमुख उपस्थितीत ईश्वर बाळबुधे, सुखदेव वंजारी, सुभाष घाटे, राजाभाऊ मोहोरे, दिलीप कांबळे, भंडारा जिल्हाध्यक्ष देवीदास लांजेवार, धनराज खोब्रागडे, सरिता मदनकर, सुनंदा मुंडले, महिला जिल्हाध्यक्ष कुंदा वैद्य, युवक जिल्हाध्यक्ष सुदिप शहारे, रामदास शहारे उपस्थित होते.
यावेळी हिंगणकर यांनी, अखिल भारतीय तेली समाज महासभा ही समाजाचे हित जोपासायचे काम करीत आहे. अखिल भारतीयचे सभासद होवून समाज संघटनेला पाठिंबा देऊन तन, मन, धनाने सहकार्य करावे. येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात समाजाचे संघटन उभे करावे, असे प्रतिपादन त्यांनी केले. लांजेवार यांनी, समाज बांधवांना संघटनेत सर्वांनी जोडावे व समाजहितासह सर्वांनी देशहित तसेच शेतकऱ्यांच्या हिताची जोपासना करावी असे मार्गदर्शन केले.(शहर प्रतिनिधी)