खांबावर चढलेली महिला कर्मचारी शॉकमुळे भाजली
By Admin | Updated: May 30, 2017 00:21 IST2017-05-30T00:21:42+5:302017-05-30T00:21:42+5:30
खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी विजेच्या खांबावर चढलेल्या महावितरणच्या एका कर्मचारी महिलेचा जिवंत विद्युत तारांना अनावधानाने स्पर्श झाल्याने ती गंभीररित्या भाजल्या गेली.

खांबावर चढलेली महिला कर्मचारी शॉकमुळे भाजली
जिल्हा न्यायालयासमोरील घटना : वीजतंत्री कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे खांबावर चढण्यासाठी दबाव
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी विजेच्या खांबावर चढलेल्या महावितरणच्या एका कर्मचारी महिलेचा जिवंत विद्युत तारांना अनावधानाने स्पर्श झाल्याने ती गंभीररित्या भाजल्या गेली. ही घटना सोमवारला सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास शहरातील जिल्हा व सत्र न्यायालयासमोरील खांबावर घडली. या महिलेची प्रकृती अत्यवस्थ असल्यामुळे उपचारासाठी तिला नागपूरला हलविण्यात आले आहे.
संध्या खोब्रागडे असे या महिला वीज कर्मचाऱ्याचे नाव आहे. भंडारा शहराला दक्षिण क्षेत्रातून वीज पुरवठा करण्यात येतो. याच क्षेत्रात पुरुष वीजतंत्री कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे पुरुषांची भरती करण्याऐवजी याक्षेत्रात पाच महिला कर्मचाऱ्यांना येथे नेमण्यात आले. यामुळे येथील पुरुष कर्मचारी विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास किंवा काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास ते स्वत: पोलवर उभे न होता सहकारी महिला कर्मचाऱ्यांना दबाव टाकून उभे होण्यास भाग पाडतात. अशाच या दबाव तंत्रातून आज हा प्रकार घडला.
जिल्हा सत्र न्यालयासमोरील डीपीवर काही तांत्रिक अडचण निर्माण झाली. ती पुर्ववत करण्याकरिता दक्षिण क्षेत्रात कार्यरत सहायक वीज कर्मचारी क्रिष्णा जिभे, अजय कुंदभरे व संध्या खोब्रागडे हे डीपीजवळ पोहचले. यावेळी सहायक कर्मचारी कुंदभरे व जिभे यांनी स्वत: डीपीवर न चढता सहकारी कर्मचारी संध्या खोब्रागडे यांना तांत्रिक अडचण दुरुस्तीकरिता डीपीवर चढण्यासाठी सांगितले. त्यावेळी तेथून प्रवाहीत ११ केव्हीच्या जम्परला अनावधानाने संध्याचा हात लागला. विद्युत पुरवठा सुरू असल्याने संध्या डीपीवरील तारांकडे ओढल्या गेली यावेळी तिने आरडाओरड केली. दरम्यान सहकारी कर्मचाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतली. ही स्थिती बघून तिथे असलेल्या अशोक लेलॅण्डचे कर्मचारी प्रकाश अटाळकर यांच्यासह परिसरातील उपहारगृहातील नागरिकांनी लाकडी बांबूच्या सहाय्याने या कर्मचारी महिलेला विद्युत तारांपासून दूर केले. वीजेच्या प्रवाहाने ही महिला कर्मचारी भाजल्या गेली. नागरिकांनी तातडीने तिला शहरातील खासगी रूग्णालयात हलविले मात्र, प्रकृती अत्यवस्थ असल्याने नागपूरला हलविण्यात आले आहे.
१५ दिवसांपूर्वीच बदलून आली
संध्या खोब्रागडे यांचे मराठवाड्यातून १५ दिवसांपूर्वीच भंडारा वीज वितरण कार्यालयात स्थानांतरण झाले. भंडारा विभागातील दक्षिण क्षेत्रात पाच महिला कर्मचाऱ्यांवर येथील कामाचा बोजा सहकारी कर्मचारी टाकत असल्याची गंभीर बाब या प्रकरणामुळे उघडकीस आली आहे. वरिष्ठ अधिकारी या गंभीर प्रकरणाकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील कर्मचाऱ्यांनी केला आहे.