महिलांनी महिलांवर अत्याचार करु नये, तरच त्या सक्षम होतील
By Admin | Updated: March 24, 2017 00:37 IST2017-03-24T00:37:17+5:302017-03-24T00:37:17+5:30
महिलांवर अत्याचार करणारे पुरुषच आहेत असा महिलांवर अत्याचार करणारे पुरुषच आहेत असा समज पसरलेला आहे. परंतु जास्तीत जास्त कुटुंबाचा अभ्यास केल्यास ...

महिलांनी महिलांवर अत्याचार करु नये, तरच त्या सक्षम होतील
रामचंद्र अवसरे यांचे प्रतिपादन : महिला मार्गदर्शन शिबिर
पवनी : महिलांवर अत्याचार करणारे पुरुषच आहेत असा समज पसरलेला आहे. परंतु जास्तीत जास्त कुटुंबाचा अभ्यास केल्यास महिलांकडून त्यांचा छळ अधिक होत असल्याचे लक्षात येते. त्यामुळे महिलांनी महिलांवर अत्याचार करु नये तरच त्या सक्षम होतील, असे प्रतिपादन आमदार अॅड. रामचंद्र अवसरे यांनी केले.
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प पवनी अंतर्गत स्थानिक गांधी भवन येथे आयोजित तालुकास्तरीय महिला मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे यांनी भुषविले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पं.स. सभापती अर्चना वैद्य, उपसभापती अल्का फुंडे, पं.स. सदस्या अस्मिता सलामे, माधुरी मेश्राम, वनिता नवधरे, गटविकास अधिकारी अनिता तेलंग, तालुका काँग्रेस अध्यक्ष माणिकराव ब्राम्हणकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास मेश्राम ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नंदागवळी वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रभाकर लेपसे यांनी उपस्थित राहून महिलांना मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना माजी राज्यमंत्री बंडुभाऊ सावरबांधे यांनी विविध क्षेत्रात महिलांची होत असलेली प्रगती म्हणजेच महिला सक्षम होत असल्याची पावती आहे. कुटुंबातील सदस्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम महिलांचे आहे. त्यांनी बालकावर संस्कार करावे व मोठ्यांनी योग्य पध्दतीने वागले पाहिजे असा वचक निर्माण करावा असा सल्ला दिला. वैद्यकिय अधिकारी डॉ. मेश्राम, डॉ. नंदागवळी, डॉ. लेपसे यांनी बालकांचे कुपोषण टाळण्यासाठी मातेने घ्यावयाची काळजी याविषयावर मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात बालविकास प्रकल्प अधिकारी बी. वाय. निमसरकार यांनी तालुक्यात अंगणवाडी सेविका व आशा यांचे कार्य योग्य पध्दतीने सुरु असल्याने कुपोषित बालकांचे प्रमाण नगण्य असल्याचे मत व्यक्त करुन महिलांच्या प्रशिक्षण शिबिराची भुमिका विषद केली. बाम्हणी व चिचाळ येथील अंगणवाडीतील बालकांनी नृत्यगित सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. शिबिरादरम्यान बालकांचे आरोग्य तपासून त्यांचेवर करावयाच्या उपाययोजनांची माहिती मातांना देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी बी. वाय. निमसरकार, संचालन सुनिल मोटघरे यांनी तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षीका शारदा वाकोडीकर यांनी केले. याप्रसंगी सांख्यिकी अधिकारी गोहत्रे पर्यवेक्षीका जाधव, हेडावू, पुराम, चिचखेडे, हुमने, वाहने उपस्थित होते. ग्रामीण भागातील अंगणवाडी कर्मचारी, आशा व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (तालुका प्रतिनिधी)