महिलांनी लघु उद्योगातून प्रगती साधावी

By Admin | Updated: June 11, 2017 00:21 IST2017-06-11T00:21:30+5:302017-06-11T00:21:30+5:30

महिलांनी लहान लहान उद्योगातून आपली प्रगती साधावी. बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक विकास साधतांना ..

Women should make progress from small scale industries | महिलांनी लघु उद्योगातून प्रगती साधावी

महिलांनी लघु उद्योगातून प्रगती साधावी

मनोज काळबांधे : वरठीत रोजगार व उद्योग मार्गदर्शन मेळावा
लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : महिलांनी लहान लहान उद्योगातून आपली प्रगती साधावी. बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक विकास साधतांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करुन घेऊन आपले उद्योग व्यवसायाचे स्वप्न पूर्ण करावे. पारंपारिक उद्योगासोबतच इतरांनाही रोजगार मिळेल असे उद्योग सुरु करुन केवळ रोजगार मागणारे न होता रोजगार देणारे व्हावे, असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरिक्षक मनोज काळबांधे यांनी केले. जिल्हा माहिती कार्यालय व महिला आर्थिक महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत सभागृह वरठी येथे आयोजित प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत रोजगार व उद्योग मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किरण लोकसंचालित साधन केंद्र वरठीच्या अध्यक्षा सारंगा आगाशे या होत्या. मनोज काळबांधे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी, विभागीय सनियंत्रण व मुल्यमापन अधिकारी केशव पवार, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, जिल्हा समन्वय अधिकारी प्रकाश हिवाळे, बँक आॅफ इंडियाचे व्यवस्थापक जगदीश डेकाटे, जिल्हा समन्वयक श्री. शेख, गौतम सहारे, मंगला कारेमोरे, प्रमिला साकुरे उपस्थित होते.
मनोज काळबांधे पुढे म्हणाले की, महिलांनी आर्थिक व्यवहार करतांना विश्वासार्हता बाळगावी, आपली फसगत होऊ नये यासाठी रोखरहित व्यवहारावर भर दयावा. एटीएम हरविल्यास तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी. कोणतीही समस्या असल्यास त्यांचे निराकरण करण्यात येईल, असे ते म्हणाले. तसेच कोणलाही आपली वैयक्तिक माहिती देऊ नये. महिला बचत गटांनी मुद्रा कर्ज घेवून शेळी पालन करुन दुग्ध व्यवसायाकडे वळावे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी सारंगा आगाशे यांनी सांगितले की, या साधन केंद्रात 50 बचत गट असून 3500 महिला आहेत. महिलांनी बचत गटाद्वारे विश्वास संपादित केला त्यामुळे आज कोणतीही बँक महिला बचत गटाच्या सदस्याला घरी येऊन कर्ज देते. तसेच महिला प्रमाणिकपणे कजार्ची परतफेड करतात. म्हणून महिला बचत गट प्रगतीपथावर आहे. यामुळे महिलांना निर्णयस्वातंत्र मिळाले आहे. स्वयंसहाय्यता करणारे बचत गट असल्यामुळे बचत गटाची रक्कम नियमित भरा, असे त्यांनी सांगितले.
प्रकाश हिवाळे यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून महिला बचतटानी कर्ज घेऊन आपले व्यवसाय सुरु करावे. ज्या महिला उद्योग व्यवसाय करण्यास उत्सुक आहेत त्यांनी या योजनेचा लाभ घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरु करावा, असे आवाहन त्यांनी केले. या कजार्साठी कोणतेही तारण लागणार नाही.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांनी बचत गटांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्ज घेऊन उद्योग उभारावा, असे सांगितले. या योजनेंतर्गत शिशु, किशोर, तरुण असे तीन टप्प्यात कर्ज मिळते. यात ५० हजार पासून ५ लाखापर्यंतची रक्कम कर्ज स्वरुपात उपलब्ध होते. महिलांनी मुद्रा कर्ज घेवून उद्योजक बनावे. यामुळे महिला सक्षमीकरणास हातभारच लागणार आहे, असे ते म्हणाले. यावेळी रामपाल चौधरी, केशव पवार, श्री. शेख, मंगला कारेमोरे, प्रमिला साकुरे यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.
वरठी किरण लोकसंचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापक गौतम सहारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. यासभेत वर्षभर केलेल्या कार्यक्रमाचा अहवाल ठेवण्यात आला. मेळाव्याचे संचालन ललिता कुंभलकर यांनी केले तर आभार अस्मिता रामटेके यांनी मानले. या कार्यक्रमास बचत गटांच्या सदस्य, महिला मोठया संख्येने उपस्थित होते.

Web Title: Women should make progress from small scale industries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.