महिला बचत गटच करु शकतात दारुबंदी
By Admin | Updated: April 4, 2015 00:14 IST2015-04-04T00:14:09+5:302015-04-04T00:14:09+5:30
गाव, खेडे, वाड्या व तांड्यात दारूबंदीची चळवळ बचतगटाच्या माध्यमातून राबविली जात आहे.

महिला बचत गटच करु शकतात दारुबंदी
तंटामुक्त गाव योजना : सामाजिक परिवर्तनासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित
भंडारा : गाव, खेडे, वाड्या व तांड्यात दारूबंदीची चळवळ बचतगटाच्या माध्यमातून राबविली जात आहे. त्यामुळे महिला बचत गट हे केवळ बचतगट न राहता समाजसुधारक गट बनले आहेत. ही सामाजिक परिवर्तनाची लाट बचत गटाच्या माध्यमातून महिलांमध्ये निर्माण झाली आहे. तेव्हा तंटामुक्त गाव समितीने दारूबंदी करण्यासाठी महिला बचतगटाचा सहभाग घेणे गरजेचे झाले आहे.
गावागावांमध्ये अनेक संस्थेत बचत गट निर्माण झाले. यामध्ये निरक्षर महिलांपासून ते उच्चशिक्षित महिलांनीसुद्धा सहभाग घेतला. त्यामुळे विचारांचे आदान-प्रदान झाले. त्यांना त्यांच्या हक्काची अधिकाराची व कर्तव्याची जाणिव झाली. शासनस्तरावरूनही त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण व मार्गदर्शन झाले. यामधूनच बचत केवळ मिळकतीतून काही भाग बचत करणारा समूदाय एवढीच त्यांची ओळख न राहता दारूबंदीची चळवळ चालविणारा सक्रिय महिला गट म्हणून त्यांच्याकडे पाहण्यात येत आहे. ही सामाजिक परिवर्तनाची लाट बचतगटाच्या माध्यमातून महिलांमध्ये निर्माण झाली आहे.
आर्थिक विकास साधत सामाजिक स्वास्थ्य रक्षणासाठी त्यांचा चाललेला हा प्रामाणिक प्रयत्न प्रशंसनीय आहे. आपल्या समस्येवर तोडगा म्हणून कायदेशीर मागार्ने दारूविरुद्ध पुकारलेल्या या लढ्यात यशस्वी होण्याचा त्यांचा संकल्प आहे. त्यामुळे महिला बचतगट हे केवळ गट न राहता समाजसुधारक गट बनले आहेत. ग्रामीण भागातील महिला सामूहिकपणे हे कार्य करीत असून त्यांनी कित्येक जागी सुरू असलेल्या हातभट्टी, मोहफुलाचे भिजवे व दारू काढणाऱ्यांना पोलिसांच्या स्वाधीन करून गुन्हे दाखल केल्याचे अनेक प्रकरणे आहेत.
गावातील जनतेत जातीय व धार्मिक सलोखा, सामाजिक व राजकीय सामंजस्य आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, अनिष्ट प्रथा व चालिरिती नष्ट करण्यासाठी जनजागृती करणे, अवैध धंद्यांना प्रतिबंध करणे व त्याचे निर्मूलन करणे, गावातील तंटे लोकसहभागातून गावातच मिटविणे तसेच तंटे निर्माण होऊ नयेत, यासाठी विविध उपक्रम राबविणे आदी उद्दिष्ट ठेवून राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू करण्यात आलेली आहे.
आजघडीला गावागावात महिला बचतगटांची स्थापना मोठ्या प्रमाणात झाली आहे. महिला बचतगटाला विश्वासात घेऊन तंटामुक्त गाव समितीने गाव तंटामुक्त करण्याचा निर्धार केला तर अनेक गावे तंटामुक्त होतील. तंटामुक्त समितीने महिला बचतगटाच्या माध्यमातून तंटामुक्त गाव मोहिमेचा प्रसार व प्रचार केल्यास गावाची शांततेतून समृद्धीकडे वाटचाल होण्यासाठी वेळ लागणार नाही. महिला संघटनातूनच अवैधधंद्याला आळा बसू शकतो. तंटामुक्त गाव मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी बचतगटाला विश्वासात घेण्याची आवश्यकता आहे. (नगर प्रतिनिधी)