महिलांनी उधळला ग्रामपंचायतीचा डाव
By Admin | Updated: June 7, 2015 00:46 IST2015-06-07T00:46:56+5:302015-06-07T00:46:56+5:30
गावातील दारुचे दुकाने गावाबाहेर नेण्याचा ग्रामपंचायतीने ठराव घेतलेला होता.

महिलांनी उधळला ग्रामपंचायतीचा डाव
अड्याळ येथील प्रकार : देशी दारु दुकान हटविण्याचे प्रकरण
अड्याळ : गावातील दारुचे दुकाने गावाबाहेर नेण्याचा ग्रामपंचायतीने ठराव घेतलेला होता. मात्र मद्यसम्राटाच्या मोहामुळे तो ठराव रद्दबादल ठरवून दारुच्या दुकानाला गावात परवानगी देण्याचा घाट ग्रामपंचायतीने रचला. ही बाब महिलांना माहिती होताच त्यांनी ग्रामपंचायतीने बोलाविलेल्या विशेष सभेत हाणून पाडला. हा प्रकार अड्याळ येथे सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे.
पवनी तालुक्यातील राज्य मार्गावर वसलेल्या अड्याळ येथे देशी दारु, बियरबारची दुकाने आहेत. या दुकानांमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले असून रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे गावातील दारुची दुकाने किमान १ कि.मी. दूर न्यावे असा अड्याळ ग्रामपंचायतीने २२ मे २०१४ ला सर्वसंमतीने ठराव पारित केला होता. त्या ठरावानुसार कारवाई सुरु करण्यात आली होती. मात्र माशी कुठे शिंकली कुणालाच कळले नाही.
एका मद्यसम्राटाने दिलेल्या आश्वासनामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने वर्षभरापूर्वी घेतलेला ठराव रद्द करून त्या दुकानमालकाच्या दुकानाला गावात दुकान सुरु करण्याची परवानगी देण्याचा घाट रचला. या संबंधात ग्रामपंचायतीने एका विशेष सभेचे आयोजन केले होते.
दरम्यान ही बाब गावातील महिलांच्या लक्षात येताच त्यांनी ग्रामपंचायतीचा हा घाट रद्द करण्याच्या दृष्टीने जनजागृती केली. सभेच्या दिवशी महिलावर्ग सभेला उपस्थित राहू नये या दृष्टीने रोजगार हमी योजनेची कामे नेमके त्याच दिवशी सुरु करण्यात आली. मात्र दारु दुकान गावाबाहेर हटविण्याबाबत महिलांनी चंग बांधल्याने रोहयोच्या मधल्या सुटीत महिलांनी ग्रामपंचायतमध्ये धडक मारली.
यावेळी ग्रामपंचायतीमध्ये आशा वर्करच्या निवडीबाबत चर्चा सुरु होती. ती चर्चा व दारुच्या दुकानाला परवानगी देण्यात यावी याबाबत चर्चा करून त्यावर मते नोंदविण्यात आली. यात ६० ते ७० उपस्थित महिलांनी ग्रामपंचायतीच्या मनसुब्यावर पाणी फेरले. त्यांनी दारु दुकान गावात राहू नये असा ठराव सर्व संमतीने पारित केला. यामुळे मद्यविक्रेत्यांचे बांधलेले मनसुबे धुळीस मिळाले. एकंदरीत या प्रकाराबाबत ग्रामपंचायतीच्या सरपंचा रजनी धारणे व ग्रामविकास अधिकारी शामराव नागदेवे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत बोलणे टाळले. (वार्ताहर)