ज्ञानेश्वर मुंदेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अर्धा एकर शेती. दीड क्विंटल धान पिकले. घरचा माणूस आजारी. पोरीच्या लग्नाचे ८० हजार कर्ज. मायक्रो फायनान्सवाले जगू देत नाही. मी लोकांच्या घरी स्वयंपाक करून घर चालविते. साहेब, आता कर्ज फेडासाठी मले किडणी विकाची आहे. कोणी घेते का जी? असे डोळ्यात पाणी आणून एक महिला शेतकरी आपली चितरकथा सांगत होती. शेतकऱ्यांने आत्महत्या केल्यानंतर सरकार मदत करते, जिवंतपणी मदत करणार नाही का जी? असा सवाल भंडारा तालुक्याच्या एका शेतकरी महिलेने करून समस्त धान उत्पादकांचे दु:खच मांडले.भंडारा जिल्ह्यातील सालेबर्डी हे गाव. मालाबाई (नाव बदललेले) ही महिला येथे राहते. घरी अर्धा एकर शेती. पती, तीन मुली, एक मुलगा असा संसार. चार वषार्पूर्वी मोठया मुलीच्या लग्नासाठी एक एकरातील अर्धा एकर शेती विकली. चार महिन्यापूर्वी मधल्या मुलीचे लग्न केले. त्यासाठी बचत गटासह मायक्रो फायनान्सचे मालाबाईंनी कर्ज घेतले. शेती पिकेल, कर्ज फेडू अशी आशा होती. परंतु अर्धा एकर शेतीत हाती आले केवळ दीड क्विंटल धान. अशातच त्यांचे पती हृदयविकाराने सतत आजारी असतात. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचा गाडा त्यांनाच चालवावा लागतो. लहान मुलगी १२ वीत तर मुलगा १० वीत शिकत आहे. अशा परिस्थितीत मालाबाई भंडारा येथे दहा किलोमीटर सायकलने येऊन एका घरी स्वयंपाक करते. त्यातून मिळणाऱ्या पैशावर कुटुंब चालविते. परंतु आता कर्जदार तिच्यामागे पैशाचा तगादा लावत आहेत.लग्नासाठी मायक्रोफायनान्स कडून मालाबाईने ४५ हजाराचे कर्ज घेतले होते. आता मायक्रोफायनान्स वसुलीसाठी तगादा लावत आहेत. बचत गटाचे बहिणीच्या नावावर घेतलेले ३० हजार रुपये थकीत आहेत. भंडारा येथील एका सहृदयी डॉक्टर दांम्पत्याने मुलीच्या लग्नासाठी तिला उसनवार आर्थिक मदत केली. हे सर्व पैसे कसे फेडावे याचीच तिला विवंचना आहे. ही विवंचना तिने सर्वांना वारंवार सांगून बघितली. परंतु उपयोग झाला नाही. त्यामुळे तिने चक्क किडनी विकायला काढली. डबडबत्या डोळ्यांनी आपली कुणी किडनी घेईल का? असा सवाल ती करीत आहे. किडनी कोणी घेणार नाही हे तिला समजून सांगताच ती आपली चितरकथा सांगते. साहेब, पैसे फेडले नाही तर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. सरकार शेतकऱ्याने आत्महत्या केल्यावर पैसे देते, मग जिवंतपणी का देत नाही? असा तिचा सवाल सुन्न करणारा असतो.धान उत्पादकांची व्यथामालाबाई सांगत होती, दहा वषार्पूर्वी चांगले धान पिकत होते. एक एकर शेतातही कुटुंब चालविण्याऐवढे धान होत होते. परंतु दोन वर्षात नापिकी झाली. गतवर्षी एक क्विंटल आणि या वर्षी दीड क्विंटल धान झाला. या धानातून लागवडीचा खर्चही निघत नाही. मुलाचे शिक्षण आणि लहान मुलीचे लग्न कसे करावे असा मालाबाईपुढे प्रश्न आहे. ही मालाबाईचीच नव्हे तर संपूर्ण धान उत्पादक शेतकºयांची अवस्था आहे.
साहेब, कर्ज फेडासाठी कोणी किडनी घेते का जी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 13:04 IST
कर्ज फेडासाठी मले किडणी विकाची आहे. कोणी घेते का जी? असे डोळ्यात पाणी आणून एक महिला शेतकरी आपली चितरकथा सांगत होती.
साहेब, कर्ज फेडासाठी कोणी किडनी घेते का जी?
ठळक मुद्देमहिला शेतकऱ्याची कहाणी मुलीच्या लग्नाने केले कर्जबाजारी