मोजमाप न करता बांधकामाला परवानगी
By Admin | Updated: May 22, 2015 01:09 IST2015-05-22T01:09:38+5:302015-05-22T01:09:38+5:30
मकरधोकडा गट क्रमांक १२८ / १ ला लागून बंधारा तयार करण्यासाठी लघु पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद यांनी तालुका भूमि अभिलेख कार्यालय भंडारा मधून कोणतेही मोजमाप न करता

मोजमाप न करता बांधकामाला परवानगी
भंडारा : मकरधोकडा गट क्रमांक १२८ / १ ला लागून बंधारा तयार करण्यासाठी लघु पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद यांनी तालुका भूमि अभिलेख कार्यालय भंडारा मधून कोणतेही मोजमाप न करता बंधारा बांधकामासाठी ठेकेदार यांना टेंडर मार्फत बंधारा तयार करण्याची परवानगी दिली. सदर बेकायदेशीर परवानगी दिल्यामुळे अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा अर्जदार यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही, या आशयाचे निवेदन राजेंद्र फुलसुंगे रा. भंडारा यांनी दिले आहे.
निवेदनानुसार, मकरधोकडा गट क्रमांक १२८ / १ ही शेती नाल्याजवळ आहे. कार्यकारी अभियंता, लघू पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद भंडारा यांनी तालुका भूमि अभिलेख कार्यालय भंडारा मधून मोजणी न करता ठेकेदार यांना बंधारा तयार करण्याची परवानगी दिली. परंतु ठेकेदार यांनी बंधारा तयार करताना गट क्रमांक १२८ / १ च्या शेतीमध्ये काही भागात बंधारा तयार केला व एक बेलाचे झाड अंदाजे २५ वर्षाचे झाड होते तरीपण या अधिकाऱ्यांनी मौक्यावर येवून कोणतीही चौकशी केली नाही.
ठेकेदार काम अटी शर्तीनुसार काम करतो की नाही याचीपण कोणतीही चौकशी केली नाही म्हणून या अधिकाऱ्यावर निलंबनाची कार्यवाही करावी.
लघु पाटबंधारे येथील अभियंत्यांनी व तलाठी यांनी खोटा पंचनामा केला आहे. गट क्रमांक १२८ / १ चे कास्तकार राजेंद्र फुलसुंगे यांचीपण कोणताही पंचनाम्यावर स्वाक्षरी घेतलेली नाही. तसेच कार्यवाही करण्यात आली नाही. म्हणून माझे लाखो रूपयाचे नुकसान झाले, याची जबाबदारी अधिकारी यांची आहे व जोपर्यंत अर्जदारांची नुकसान भरपाई होत नाही. तोपर्यंत ठेकेदार याचा बिल देण्यात येऊ नये, अशी मागणी आहे. मौजा मकरधोकडा १२८ / १ च्या शेतीजवळ बंधारा तयार करण्यात आला. त्या बंधाऱ्यामध्ये सिमेंट व लोखंडी सळाखी कमी प्रमाणात वापरण्यात आला. बंधाऱ्यामध्ये काँक्रीट न करता बोल्डर घालण्यात आले. तरीपण या प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी फुलसुंगे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)