वादळी वाऱ्याने विजेच्या तारा तुटल्या
By Admin | Updated: April 28, 2015 00:39 IST2015-04-28T00:39:53+5:302015-04-28T00:39:53+5:30
वादळी वाऱ्याच्या तडाख्यात जंगलव्याप्त डोंगरी येथे विजेच्या तारा तुटून पडल्याने दोन बकऱ्या मृत्यूमुखी पडल्या.

वादळी वाऱ्याने विजेच्या तारा तुटल्या
दोन शेळ्यांचा मृत्यू : डोंगरी येथील घटना
तुमसर : वादळी वाऱ्याच्या तडाख्यात जंगलव्याप्त डोंगरी येथे विजेच्या तारा तुटून पडल्याने दोन बकऱ्या मृत्यूमुखी पडल्या. हाकेच्या अंतरावर आदिवासी बांधवांची चार ते पाच घरे होती. सुदैैवाने ती थोडक्यात बचावली. वीज तारा तुटल्यावर तत्काळ वीज पुरवठा खंडीत होतो, परंतु येथे तो झाला नाही.
डोंगरी बु. येथील रानटोली परिसरात आदिवासी बांधवांची चार घरे आहेत. विठ्ठल दागो उईके यांच्या घरच्या शेळ्यांवर वीज वाहून नेणाऱ्या तारा पडल्या त्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी ७ च्या सुमारास या परिसरात सुसाट वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. लोभी-रानटोली-चांदमाराकडे उच्च दाबाच्या वीज तारा डोंगरी बु. येथून जातात. सुमारे १५ ते २० वर्षापुर्वीची ही वीज वाहून नेणारी लाईन आहे. घराजवळ वीज प्रवाह वाहून नेणाऱ्या तारा पडल्याने शेळ्यांना वीज प्रवाहाचा धक्का बसला. येथून हाकेच्या अंतरावर चार घरे होती. वीज तारा तुटल्यावर तात्काळ वीज प्रवाह खंडीत होतो, परंतु येथे तो झाला नाही हे विशेष.
या परिसराचे कनिष्ठ अभियंता चाफेकर यांना यासंदर्भात विचारले असता त्यांनी मी सध्या तुमसरात आहे. घटनास्थळावर गेल्यानंतर पाहणी केल्यावर कळवितो असे उत्तर दिले. घटना रविवारी सायंकाळी घडली. सोमवारी सकाळी ११.३० वाजेपर्यंत चाफेकर यांचेकडे माहिती उपलब्ध नव्हती. म्हणजे ते कर्तव्य बजावित नाही, असे दिसून येते.
डोंगरीचे सरपंच तोफलाल रहांगडाले यांनी शेळ्या मृत्यू प्रकरणी विठ्ठल उईके यांना आर्थिक मदत वीज वितरण कंपनीने द्यावे, अशी मागणी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
वादळी पावसाने दोन लाखांचे नुकसान
सालेभाटा : रविवारला दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी पावसाचा फटका लाखनी तालुक्यातील सालेभाटा येथील शेतकऱ्यांना बसला. यात येथील शेतकरी नरेश बोपचे यांच्या डेअरी फार्मचे पत्रे उडाले. यात एका गाईच्या वासराचा मृत्यू झाला. सुरेश बोपचे यांच्या शेतावरील आंबा पिकाचे अतोनात नुकसान झाले. परिसरातील इतरही शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे व घरादारांचे मोठे नुकसान झाले. यात बोपचे यांचे अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.