विकासाचा ध्यास सोडणार नाही
By Admin | Updated: February 19, 2015 00:34 IST2015-02-19T00:34:22+5:302015-02-19T00:34:22+5:30
पक्ष संघटनेसाठी कार्यकर्ता महत्वाची भूमिका बजावतो. यामुळेच पक्ष वाढतो. सत्तेत असताना विकास हा एकच ध्यास डोळ्यासमोर ठेवला.

विकासाचा ध्यास सोडणार नाही
लाखांदूर : पक्ष संघटनेसाठी कार्यकर्ता महत्वाची भूमिका बजावतो. यामुळेच पक्ष वाढतो. सत्तेत असताना विकास हा एकच ध्यास डोळ्यासमोर ठेवला. परंतु जनतेने नाकारले. केंद्रात सत्ता नसली तरी वजन आहे. त्यामुळे भंडारा - गोंदिया जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास सोडणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी केले.
लाखांदूर येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अविनाश ब्राम्हणकर, उदय भैय्या, चंद्रशेखर टेंभुर्णे, नरेश दिवटे, शिलमंजू सिव्हगडे, तालुका राकाँ अध्यक्ष बालू चुन्ने, देविदास राऊत, मनोहर चंद्रिकापुरे उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, केंद्रात सत्ता स्थापन करणाऱ्यांनी जनतेचा विश्वासघात करीत शेतकरी, गोरगरीबांच्या शासन योजनांना कात्री लावली. जनधन योजनेखाली बँकेत खाते उघडण्यास लावून अद्याप त्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रतिक्षा संपता संपेना. दोन्ही जिल्ह्यावर संकट ओढवले. नक्षलग्रस्त भाग वगळता, शेतकऱ्यांच्या धानाला भाव मिळावा म्हणून बोंबा मारणारे न्याय न देता गप्प बसले. काळ्या पैशाचा मुद्दा मोठ्या गाजावाजात उचलून धरला. मात्र सत्ता प्राप्त होताच जनतेकडे दुर्लक्ष करून जिल्ह्याच्या विकासाला कैची लावली. सत्तेत नाही, मात्र वजन कमी नाही. निवडणुकीत हरलो. मात्र जिल्ह्यातील शेतकरी, बेरोजगार यांच प्रश्न सदैव सोडविण्यासाठी आपण सदैव तत्पर असून त्यासाठी संघटन व प्रत्येक कार्यकर्त्याने तन मनाने पक्ष वाढीसाठी आतापासूनच कामाला लागावे. जेणेकरून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत त्याचा लाभ होईल असे आवाहनही कार्यकर्त्यांना केले. संचालन बालू चुन्हे यांनी तर आभारप्रदर्शन देवीदास राऊत यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)