उसर्रा : आधीच अल्प पाऊस त्यातही शेतकऱ्यांनी धानाची लागवड केली. भारनियमनाने शेतकऱ्यांची कंबर मोडली. एका पाण्याखाली धानपिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या सर्व कारणाने यंदा शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.उसर्रा परिसरातील उसर्रा, सालई (खुर्द), टांगा, काटेबाम्हणी, टाकला, सिहरी, ताडगाव, धोप, मालदा, सालई बु., विहिरीगाव, बपेरा, आंबागड आदी भागात धानाचे उत्पादन घेतले जाते. सुरुवातीला अल्प पाऊस असल्याने काहींनी पऱ्हे सुद्धा टाकले नाही. तर ज्यांच्याकडे पाण्याचे साधन आहे अशांनी धानपिकाची लागवड केली. काहींनी निसर्गावर अवलंबून धान पिकाची लागवड केली. एक दोन पाऊस खूप जोरदार पडले. तेव्हा शेतकऱ्यांना आशा पल्लवीत झाल्या. नंतर पावसाने दडी मारली तेव्हा बावनथडी धरणातून पाणी शेतकऱ्यांना देण्यात आले. मात्र बावनथडी धरणाचे पाणी शेतकऱ्यांना पोहचविणे पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांना जमले नाही. याचे कारण म्हणजे पादचाऱ्याचे काम अद्यापही न झाल्याने थेट शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहचू शकले नाही.यातच धान पिकाला मावा, तुडतुडा, खोडकिडासारख्या रोगांची लागण झाली. यात धानपिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. आता शेतकऱ्यांना एका पाण्याची आवश्यकता आहे. ज़्यांच्याकडे पाण्याची सुविधा जसे विहिर, बोअरवेल आहेत. परंतु सध्या परिसरात जास्तीचे भारनियमन सुरु असून अल्पवेळेत शेतकऱ्यांना वीज पुरवावी लागते. त्यामुळे शेतकरी वेळेवर शेतात पाणी देऊ शकत नाही. शेतकऱ्यांनी धानपिकासाठी बँका, वित्तीय संस्थेकडून कर्ज काढले. कर्जासाठी बँकेचे पदाधिकारी तगादा लावत आहेत. पण पिकच होणार नाही तर कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. काही दिवसाअगोदर परिसरात रानडुकरांनी हैदोस घालून धानपिके नष्ट झाली होती हे विशेष. या सर्व कारणाने बळीराजा दूरावला असून यंदा शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार यात काही शंका नाही. (वार्ताहर)
शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार?
By admin | Updated: October 5, 2014 23:00 IST