रानटी डुकरांच्या उपद्रवाने शेत पिकाचे सुमार नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:31 IST2021-04-05T04:31:34+5:302021-04-05T04:31:34+5:30

शेतकरी हतबल पालांदूर : रानडुकरांचा वाढता उपद्रव शेतकऱ्यांना चिंतेचा विषय ठरलेला आहे. कालपर्यंत हरभऱ्याची सुमार नुकसान केलेल्या रानटी डुकरांनी ...

Wild boar infestation damages crops | रानटी डुकरांच्या उपद्रवाने शेत पिकाचे सुमार नुकसान!

रानटी डुकरांच्या उपद्रवाने शेत पिकाचे सुमार नुकसान!

शेतकरी हतबल

पालांदूर : रानडुकरांचा वाढता उपद्रव शेतकऱ्यांना चिंतेचा विषय ठरलेला आहे. कालपर्यंत हरभऱ्याची सुमार नुकसान केलेल्या रानटी डुकरांनी आता आपला मोर्चा गर्भावस्थेत असलेल्या धान पिकावर वळवलेला आहे. डोळ्यादेखत होत असलेले नुकसान शेतकऱ्यांना हतबल करीत आहे.

पालांदूर परिसरात नदी-नाले व झुडपी जंगलांचे प्रमाण बऱ्यापैकी आहे. रानटी डुकरांच्या नैसर्गिक अधिवासासाठी हे ठिकाण खूप मोठे वरदान ठरले आहे. दिवसाला या ठिकाणी विश्रांती घेऊन रात्रीला सैन्यासारखे पिकावर तुटून पडतात. रात्रीच्या अंधारात बेधुंद होत पिकांची सुमार नुकसान करतात. शेतकऱ्यांना यांचा बंदोबस्त करताना कायद्याच्या आडकाठी तयार झाल्याने शेतकऱ्यांचा नाईलाज झाला आहे.

उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतात हल्ली धान पिकाव्यतिरिक्त इतर दुसरे पीक दुर्लभ आहे. त्यामुळे रानटी डुक्कर उन्हाच्या झळा सहन करण्याच्या अनुषंगाने धानाच्या चिखलात स्वताला लोटून घेतात. त्यामुळे गर्भावस्थेत असलेले पीक जमीनदोस्त होत आहेत. काही ठिकाणी धान पिकाला कात्री प्रमाणे कापलेही आहेत. रात्रीच्या अंधारात शेतावर पंप सुरू करायला जावेच लागते. तेव्हा हे सगळे चित्र डोळ्यासमोर येऊनही शेतकरी भीतिपोटी काही करू शकत नाही. वनविभागाने पुढाकार घेत, यातून शेतकरी वर्गाला काहीतरी मार्ग दाखवावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून होत आहे.

चुलबंद खोरा सदाबहार आहे.

नदी-नाल्यांचा आसरा असल्याने वर्षभर रानटी डुकरांचा या परिसरात हक्काचा मुक्काम आहे. खरीप, रब्बी, उन्हाळी अशा तीनही हंगामात रानडुकरांचा उपद्रव शेतकरी वर्गाला सहन करावा लागतो. रानटी डुकरांचे जत्थेच्या जत्थे रात्रीच्या अंधारात बघायला मिळतात. त्यांचा बंदोबस्त करणे कठीण नाही, परंतु वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये हात बांधले असल्याने शेतकरी राजा निरुपाय ठरला आहे.

सुमारे पाच एकर शेतात हरबऱ्याचे पीक जोमात आले होते. फळधारणा होईपर्यंत अपेक्षित डुकरांचा त्रास नव्हता. मात्र, हरबऱ्याने घेंगरे पकडल्यानंतर रानटी डुक्कर यांचा उपद्रव असह्य ठरला. सुमारे चाळीस पोती अपेक्षित असणारा हरभरा केवळ १४ पोती एवढाच झाला. आता धान पिकाचेही नुकसान करीत आहेत. वनविभागाकडे मागणी करूनही अत्यल्प मिळत असल्याने व कागदोपत्री समस्या मोठी असल्याने दाद मागितली नाही.

- प्रभाकर कडूकार,

नुकसानग्रस्त (बारमाही) शेतकरी पालांदूर.

Web Title: Wild boar infestation damages crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.