गळा आवळून पत्नीचा खून
By Admin | Updated: August 19, 2015 00:57 IST2015-08-19T00:57:22+5:302015-08-19T00:57:22+5:30
मुलांना क्रूर वागणूक देत असल्याच्या संशयावरून पत्नीशी नेहमी खटके उडायचे. त्यावरुन पती-पत्नीत वाद झाला.

गळा आवळून पत्नीचा खून
भंडारा : मुलांना क्रूर वागणूक देत असल्याच्या संशयावरून पत्नीशी नेहमी खटके उडायचे. त्यावरुन पती-पत्नीत वाद झाला. संतापाच्या भरात पत्नीला मारहाण केली. एवढ्यावर न थांबला त्याने तोंड दाबून तिचा गळा आवळला यात तिचा मृत्यू झाला. ही घटना पवनी तालुक्यातील वळद येथे सोमवारी रात्री घडली.
बबिता हरिदास दुधपचारे (३०) असे मृत महिलेचे नाव आहे. हरिदास इस्तारी दुधपचारे (३६) असे आरोपी पतीचे नाव आहे. अड्याळ पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वळद पुनर्वसन येथील हरिदास दुधपचारे याला पहिल्या पत्नीपासून तीन अपत्ये आहेत. त्याचा दुसरा विवाह बबीता हिच्याशी झाला असून तिच्यापासून एक वर्षाचा मुलगा आहे. दोन पत्नीच्या संसारात त्याला चार अपत्ये असल्याने पहिल्या पत्नीच्या तीन अपत्यांना बबीता चांगली वागणूक देत नाही, असा संशय घेत होता.
तिन्ही मुलांची देखरेख न करता त्यांच्या खाण्यापिण्याकडे बबीता दुर्लक्ष करीत असल्याच्या संशयावरून त्या दोघांमध्ये नेहमी खटके उडायचे. यातून वाद व्हायचा. वादानंतर मारहाण करायचा. दरम्यान याच कारणावरुन सोमवारला दुपारी त्यांच्यात पुन्हा वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने संतप्त हरिदासने बबीताला काठीने मारहाण केली. मारहाणीत जमिनीवर कोसळल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतरही त्याने तिला लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्याने तोंड दाबून बबिताचा गळा आवळला. तिचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यावर त्याने मृतदेह घरातच दडवून ठेवला.
मेंदूच्या झिणझिण्या आणणाऱ्या या घटनेनंतर हरिदासने चारही मुलांची आंघोळ करून दिली. घटनेची माहिती होताच पोलीस पाटील नत्थू दुधपचारे यांनी अड्याळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून ठाणेदार ए. के. नेवारे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी अड्याळ पोलिसांनी हरिदासविरूध्द भादंवि ३०२ कलमान्वये गुन्हा नोंदवून अटक केली. तपास ठाणेदार नेवारे करीत आहे. (शहर प्रतिनिधी)