पतीच्या तेरवी कार्यक्रमात पत्नीचा मृत्यू
By Admin | Updated: October 19, 2015 00:42 IST2015-10-19T00:42:52+5:302015-10-19T00:42:52+5:30
जन्म व मृत्यू कुणाच्या हातात नाही. पतीच्या मृत्यूनंतर त्यांचा विरह पत्नीला असह्य होत गेला आणि पतीच्या तेरवी कार्यक्रमाच्या दिवशीच ..

पतीच्या तेरवी कार्यक्रमात पत्नीचा मृत्यू
तुमसर : जन्म व मृत्यू कुणाच्या हातात नाही. पतीच्या मृत्यूनंतर त्यांचा विरह पत्नीला असह्य होत गेला आणि पतीच्या तेरवी कार्यक्रमाच्या दिवशीच पतीच्या विरहात पत्नीनेही जगाचा निरोप घेतला. मनाला गहिवरून सोडणारी ही दुर्दैवी घटना तालुक्यातील परसवाडा (देव्हाडी) येथे रविवारी दूपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
जमनाबाई रामाजी शेंडे (७६) असे मृत महिलेचे नाव आहे.
१३ दिवसांपूर्वी जमनाबाई यांचे पती रामाजी शेंडे यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. रामाजी शेंडे तुमसर पंचायत समितीचे माजी उपसभापती होते. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातही ते सक्रीय होते. रामाजी शेंडे यांच्या तेरवीच्या कार्यक्रम रविवारी होता. कार्यक्रमानिमित्ताने नातलग तथा गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने गोळा झाले होते. स्वयंपाक सुरु होता. विधीनुसार कार्यक्रम एकीकडे सुरु होता. अचानक जमनाबाई यांना घाबरल्यासारखे जाणवू लागले. मुले, मुली, तथा उपस्थितांनी जमनाबाईची विचारपुस केली. मात्र जमनाबाई यांना तिव्र हृदयविकाराचा धक्का आल्याने त्यांचा काही वेळातच मृत्यू झाला. सर्वांना मायेची छाया देणारी जमनाबाई क्षणातच जग सोडून गेली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या मृत्यू पश्चात ३ मुले, ३ मूली व मोठा आप्त परिवार आहे. जमनाबाई शेंद्र यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी १० वाजता माडगी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. पतीसोबत आणाभाका घेणारी जमनाबाईने १३ दिवस एकाकी जीवन जगली. परंतु खऱ्या अर्थाने त्यानी साथ सोडली नाही असेच म्हणावे लागेल. या घटनेची संपूर्ण पंचक्रोशीत एकच चर्चा होती. (तालुका प्रतिनिधी)