हदयविकाराच्या धक्क्याने पतीनंतर पत्नीचे निधन; दोन चिमुकले झाले पोरके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 05:09 PM2019-09-24T17:09:32+5:302019-09-24T17:10:02+5:30

पतीला आलेल्या हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचे निधन झाल्यानंतर अवघ्या काही तासात पत्नीचेही हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याची घटना येथे मंगळवारी ( दि. २४) घडली.

Wife's death after husband's death; Two kids behind | हदयविकाराच्या धक्क्याने पतीनंतर पत्नीचे निधन; दोन चिमुकले झाले पोरके

हदयविकाराच्या धक्क्याने पतीनंतर पत्नीचे निधन; दोन चिमुकले झाले पोरके

Next

संजय साठवणे
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पतीला आलेल्या हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचे निधन झाल्यानंतर अवघ्या काही तासात पत्नीचेही हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याची घटना येथे मंगळवारी ( दि. २४) घडली. सात वर्षांपूर्वी अग्नीला साक्षी मानून हे दोघेजण विवाहबंधनात अडकले होते. त्यांच्या संसारवेलीवर दोन फुले उमलली. सुखाचा संसार सुरु असताना अचानक पतीला सोमवारी संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच मृत्यू झाला. पतीचा मृत्यू झाल्याचे कळताच पत्नीला दु:ख अनावर झाले आणि यातच तिचाही हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. त्यांचे दोन चिमुकले मात्र आईवडीलांच्या मायेला कायमचे पारखे झाले. साकोली तालुक्यातील वडद गावावर या घटनेने शोककळा पसरली आहे. दोघांच्याही चितेला लहानग्या मुलाने भडाग्नी दिला तेव्हा उपस्थितांना अश्रू अनावर झाले.
घनश्याम केशव कापगते (३८) आणि देवांगणा घनश्याम कापगते अशी पतीपत्नीची नावे आहेत. अवघ्या सहा तासाच्या अंतरात पती पत्नीचा मृत्यू झाला. घनश्याम हा वडद ग्रामपंचायतीत परिचर म्हणून कार्यरत होता. सोमवारी आपले कार्यालयीन काम आटोपून तो सायंकाळी घरी आला. रात्री कुटूंबासह भोजन घेतले. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला. साकोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेतच मृत्यू झाला. घनश्यामचा मृतदेह पहाटे घरी आणताच पत्नी देवांगणाने एकच हंबरडा फोडला. दु:ख आवेगात तिलाही हृदयविकाराचा झटका आला. तात्काळ साकोलीच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने भंडारा येथे नेण्याचा सल्ला देण्यात आला. भंडारा येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच तिचाही मृत्यू झाला.
हृदय सुन्न करणारी ही घटना मंगळवारी साकोली तालुक्यात घडली तेव्हा प्रत्येक जण हळहळताना दिसत होता. अंत्यसंस्कारासाठी दोघांचेही मृतदेह घरी आणण्यात आले. पतीच्या बाजूला पत्नीचा मृतदेह ठेवण्यात आला होता. दोन चिमुकल्यांना तर आपल्या आईबाबाला काय झाले हेही कळत नव्हते. अंत्यसंस्काराची तयारी झाली. परिसरातील शेकडो नागरिक अंत्ययात्रेत सहभागी झाले. पतीपत्नीची अंत्ययात्रा स्मशानभूमीत पोहचली. पाच वर्षीय आदित्यने आपल्या आईवडीलांच्या चितेला भडाग्नी दिला.

आदित्य आणि जागृती झाले पोरके
घनश्याम आणि देवांगणा या दांपत्याला आदित्य (५) आणि जागृती (साडेतीन) ही दोन मुले आहेत. सुखाचा संसार सुरु असताना अचानक पतीपाठोपाठ पत्नीचाही मृत्यू झाला. आदित्य आणि जागृती कायमचे पोरके झाले. या चिमुकल्यांचा सांभाळ आता करायचा तरी कसा असा प्रश्न उपस्थितांपुढे निर्माण झाला. पतीपत्नीच्या मृत्यूने वडद गावावर स्मशानशांतता पसरल्याचे दिसत होते.

Web Title: Wife's death after husband's death; Two kids behind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.